पुणे- गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्स (इव्हीएम) वापरण्याचा अनुभव असला तरी यंदाच्या यंत्रांमध्ये नवीन फीचर्स असल्यामुळे त्याबाबत माहिती घेवून त्यानुसार कार्यवाही करावी, असे अपर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मास्टर ट्रेनर्सना मतदान यंत्रांबाबत तसेच व्हीव्हीपॅट (वोटर व्हेरिफीएबल पेपर ऑडीट ट्रेल) बाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, शिल्पा करमरकर आदी अधिकारी उपस्थित होते.
डॉ. पडियार म्हणाल्या, 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेल्या मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट नव्हते. त्यामुळे मतदान यंत्रांच्या जोडणीचा क्रम योग्य पध्दतीने लक्षात घेणे आवश्यक आहे. मतदान यंत्रांची काळजीपूर्वक हाताळणी, जोडणीचा क्रम न चुकवणे, दिलेल्या आदर्श सूचनांचे पालन करणे याबाबत त्यांनी सूचना दिल्या. मतदान यंत्रांच्या जोडणीबाबत पुरेसा सराव करण्यात यावा, असेही त्या म्हणाल्या.
विजयसिंह देशमुख यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत सर्वांनीच कटीबध्द असणे गरजेचे आहे. मतदान यंत्रांबाबत मनात कोणताही प्रश्न, शंका न ठेवता, त्याचे निरसन करुन घ्यावे. सेक्टर ऑफीसर्सना मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण देणार असल्यामुळे त्यांनी आपले प्रशिक्षण काळजीपूर्वक पूर्ण करायला हवे, असे ते म्हणाले.