पुणे- मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आलेला एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणच्या (पीएमआरडीए) अतिरिक्त आयुक्त डॉ. कविता द्विवेदी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, लोकसभेसाठी मतदार म्हणून ऑनलाईन तसेच ऑफलाइन अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची तपासणी करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये. आलेल्या प्रत्येक अर्जावर कार्यवाही झाली पाहिजे, असे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी राम यांनी त्याबाबत नियमित आढावा घेण्यात येईल, असे सांगितले. मतदार यादीचा कार्यक्रम कालबध्द असल्याने नियोजनबध्द आणि गतीने काम करण्यात यावे, त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करुन दररोज आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी संबंधितांना केल्या.
बैठकीत जिल्हा निवडणूक नियोजन आराखडा,स्वीप कार्यक्रम (मतदार जागृती कार्यक्रम), वाहन आराखडा, दिव्यांगासाठीच्या सुविधा, निवडणूक खर्च व्यवस्थापन याबाबतचा आढावा घेण्यात आला. सी-व्हीजील अॅप यावेळी महत्त्वाचे ठरणार असून याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.