पुणे- पाणीटंचाईमुळे आगामी काळ कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असून शेती आणि पशुधनाबाबत शेतक-यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आकाशवाणीच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर, पशुधनाची काळजी याबाबत तज्ञ तसेच अनुभवी शेतक-यांच्या मुलाखती, व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल, असे आकाशवाणीचे (कार्यक्रम) उपसंचालक गोपाळ अवटी यांनी सांगितले. आकाशवाणीच्या माध्यमातून ग्रामीण विकासावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. ऊरळी कांचन येथील बायफ संस्थेमध्ये ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रम अधिकारी अनिलकुमार पिंगळे, बायफचे कृषी विभाग प्रमुख प्रमोदकुमार ताकवले, सहायक अभियंता रवींद्र रांजेकर, संशोधन संचालक जयंत खडसे, जिल्हा कृषी विकास अधिकारी बाळासाहेब पलघडमल, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, डॉ. धनंजय गावंडे, पशुसंवर्धनचे सहायक आयुक्त डॉ. सुनील गिरमे, राजाराम चौधरी, डॉ. महेंद्र घागरे, सुनील पोकरे, बाहुबली टाकळकर, ब्रम्हदेव सरडे, डॉ. महेंद्र मोटे,डॉ. मनोजकुमार आवारे, कुणाल पुंडे,डॉ. भरत रासकर, प्रिया बेल्हेकर आदींची उपस्थिती होती.
ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीची दर तीन महिन्यांनी बैठक होत असते. गत तिमाहीत प्रसारित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना मिळालेला प्रतिसाद तसेच आगामी तीन महिन्यांचे नियोजन याबाबत बैठकीत चर्चा होते. पाणीटंचाई लक्षात घेवून येणा-या तिमाहीत ग्रामीण भागातील जनतेसाठी प्रबोधनपर आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीटंचाईमुळे कृषी उत्पादन तसेच कृषी पूरक उत्पादनांवर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करुन चारा उत्पादन, भाजीपाला उत्पादन करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पारंपरिक शेती व्यवसायाव्यतिरिक्त शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करणा-या युवकांच्या, तरुणींच्या मुलाखतींचे प्रसारण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पशुधनाची काळजी, आरोग्यविषयक सल्ला, फोन इन कार्यक्रम, यशोगाथा, मनोरंजनपर लोकनाट्य, किर्तन, लोकसंगीत आदींचाही प्रसारणामध्ये समावेश करण्यात आला आहे. बैठकीत सदस्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

