मुंबई : नवी मुंबईतून मुंबई येथे जलदगतीने पोहोचता यावे यासाठी येत्या दोन वर्षात नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
या संदर्भातील प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य संदीप नाईक, अजित पवार, भास्कर जाधव, योगेश सागर, सुभाष पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. पतंगराव कदम, जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. श्री. फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतुकीचा मार्ग तयार करण्यासाठी साधारणपणे 18 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असे असले तरी या मार्गावरील सर्व सुरक्षा तपासून साधारणपणे मार्च 2018 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात या मार्गावरील जलवाहतूक सुरू होईल. नवीन भाऊचा धक्का (मुंबई) ते नेरुळ, नवी मुंबई अशी जलवाहतूक व्यवस्था तयार करण्यात येत आहे. पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूक सुरू करण्यासाठी नवीन भाऊचा धक्का येथे मुंबई बंदर विश्वस्त (MbPT), केंद्र शासन, तसेच नेरुळ- नवी मुंबई येथे सिडको आणि अलिबागच्या मांडवा येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामाफत जलप्रवासी टर्मिनलची उभारणी करण्यात येत आहे. मांडवा येथे करावयाच्या जलप्रवासी प्रकल्प टर्मिनलच्या कामाची निविदा निश्चित करण्यात आली असून याचे काम लवकरच सुरू होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडिया येथील जलवाहतुकीबाबत फिजिबिलिटी अहवाल तयार करण्यात येईल. तसेच या मार्गावर जलवाहतूक करीत असताना प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने याबाबत सर्व तपासणी करण्यात येईल, असे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
आळंदीतील सुविधांबाबत लवकरच बैठक – मुख्यमंत्री
आळंदी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता आळंदी नगरपरिषदेसंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने इंद्रायणी नदीतील कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये सांडपाणी सोडल्याबाबतचा प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य सुरेश गोरे, संग्राम थोपटे यांनी या संदर्भातला प्रश्न विचारला होता.
श्री. फडणवीस म्हणाले की, आळंदी नगरपरिषदेमार्फत करण्यात येणारा पाणीपुरवठा तसेच पाण्याची उपलब्धता याबाबत माहिती घेण्यात येईल. आळंदी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन यासंदर्भात सोयीसुविधा पुरवण्याबाबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यात येईल. महानगरपालिकांनी 100 टक्के पाण्यावर प्रक्रिया करावी, नदी पात्रात स्वच्छ पाणी सोडावे यासाठी एक धोरण सर्व महानगरपालिकांसाठी ठरविण्यात येत आहे. याबाबत येत्या दोन वर्षात स्वतंत्र धोरण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.
नांदगाव तर्फ तारापूर जेट्टीचे काम ग्रामस्थांना विश्वासात घेऊन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नांदगाव तर्फ तारापूर येथील प्रस्तावित जेट्टी तयार झाल्यास महाराष्ट्र देशामध्ये जास्त मालवाहतूक करणारे राज्य ठरू शकेल, मात्र असे करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय या संदर्भातील कोणतेही काम केले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दि
पालघर येथील नांदगाव तर्फ तारापूर येथील प्रस्तावित जेट्टीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याबाबतचा प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य मनिषा चौधरी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भातला प्रश्न विचारला होता.
श्री. फडणवीस या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, सन 2011 ते सन 2014 या काळात या प्रस्तावित जेट्टीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. तर या वर्षी केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागानेही परवानगी दिली आहे. मात्र असे असले तरी याबाबत येथील स्थानिकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे सदर प्रकरण आता राष्ट्रीय हरित लावादाकडे न्यायप्रविष्ट आहे. नांदगाव जेट्टी आणि वाढवण बंदर यासंदर्भात राज्य शासनामार्फत अभ्यास करण्यात येत आहे. सदर प्रस्तावित जेट्टी उभारण्याचे काम राज्य शासन आणि शिपिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सदर जेट्टी तयार करताना येथील स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या शंकांचे निरसन करुनच काम केले जाईल. सदर जेट्टीमुळे महाराष्ट्र देशामध्ये जास्त मालवाहतूक करू शकेल. यामुळे महाराष्ट्र अधिक समृध्द होण्यास मदत होईल.
तक्रारी आल्यास बदलापूर घरकुल योजनेतील गैरव्यवहाराबाबतची चौकशी करणार – डॉ. रणजीत पाटील
राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेबाबत गैरव्यवहाराच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्याबाबत चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले
बदलापूर नगरपालिका हद्दीमधील कुळगाव येथे राबविण्यात आलेल्या (बीएसयूपी) शहरी गरिबांसाठीच्या घरकुल योजनेसंदर्भातला प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा सदस्य किसन कथोरे, यशोमती ठाकूर, संजय केळकर, जितेंद्र आव्हाड, संजय सावकारे यांनी या संदर्भातला प्रश्न विचारला होता
डॉ. पाटील म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगरपालिका हद्दीमधील कुळगाव येथे शहरी गरिबांसाठी राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे किंवा कसे, किंवा या योजनेत काही गैरव्यवहार झाला आहे का, लाभार्थी निवडीमध्ये काही निकष डावलण्यात आले आहेत का याबाबत ठाणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल येत्या एका महिन्यात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय घरकुल योजनेबाबत एक स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून यामध्ये या योजनेतील गैरव्यवहाराबाबतचे सर्व तपशील तपासण्यात येतील.

