मुंबई : महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आदराने आणि अभिमानाने घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व आता चित्रकलेच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे शिवचरित्र प्रदर्शनाचे उदघाटन आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते.
दीपक गोरे, श्रीकांत चौगुले, गौतम चौगुले या चित्रकारांनी कुंचल्यातून शिवराज्याभिषेक साकारला आहे. या सर्वांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. रायगड, राज्याभिषेक आणि महाराजांचा व्यापक दृष्टीकोन यावर 120 तैलचित्रे साकारली आहेत. जहांगीर आर्ट गॅलरी येथे प्रदर्शन 20 जूनपर्यंत असून या प्रदर्शनाच्या निमित्ताने येथे येणाऱ्यांना इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे.




