पुणे,दि.23:- महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत‘गुळ, बेदाणा व काजूमहोत्सव 2018’चे आयोजन श्री गणेश कला क्रिडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे दि. 17 ते 21 ऑक्टोबर 2018 करण्यात आलेले होते. कोल्हापूर,सांगली,कोकण विभाग तसेच राज्यातील अन्य भागातून शेतकरी,शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्या,सहकारी संस्था या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले होते. सुमारे 50 स्टॉलच्या माध्यमातून खास दसरा-दिवाळी सणा निमित्त पुणेकरांना उपलब्ध करून देण्यात आले.
महोत्सवामध्ये काजु,गुळ,बेदाणा,हळद,काकवी,गुळ पोळी,गुळ वडी,आवळ्यापासून केलेले प्रक्रिया पदार्थ, आजरा घणसाळ तांदूळ, काजू गर, आमसूल/कोकम इ. उपपदार्थही पुणेकरांना उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याबरोबरच यामधील बरीच उत्पादने हे सेंद्रिय असल्याने महोत्सवास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.काही उत्पादकांना पुनश्च पुरवठा करण्यासाठी येथील ऑडर्स तसेच काही उत्पादक गट/कंपनी यांना निर्यातीसाठी नमुना पाठविण्याबाबत सांगण्यात आले.
या महोत्सवात साधारणपणे 3600 किलो गुळ,1100 किलो बेदाणा,1020 किलो काजु विक्री झालेली असुन हळद व इतर उपपदार्थांचीही मोठ्या प्रमाणत विक्री झाली. महोत्सवाद्वारेसुमारे रु.22 लाखापेक्षा जास्त उलाढाल झाली, एकुणच महोत्सवास ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला.सुमारे 15 हजार पुणेकरांनी भेट दिली, अशी माहिती कार्यकारी संचालक, श्री. सुनिल पवार यांनी दिली.