पुणे दि. ६- माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने लोकराज्य हे मासिक प्रकाशित करण्यात येते. तरुणांनी हे मासिक आवर्जून वाचावे. लोकराज्य मासिक करीयर घडवण्यासाठी गरजेचे असून ती यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.
वाचन संस्कृती वाढावी यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सासवड येथील वाघीरे महाविद्यालयात लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य नितीन घोरपडे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्रा. डॉ. एस. एस. जगताप,डॉ. किरण रणदिवे, प्रा. पल्लवी लोळे आदी उपस्थित होते.
डॉ. घोरपडे म्हणाले, आजच्या पिढीत समाज माध्यमांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे वाचनाची सवय मात्र नष्ट होतांना दिसत आहे. लोकराज्य वाचक मेळाव्यातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यसाठी मदत होणार आहे. लोकराज्य या अंकातील प्रत्येक पान वाचनीय आहे. जसा हा अंक स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा आहे तसाच तो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गरजेचा आहे. वाचन हा विद्यार्थ्याचा आत्मा आहे, त्यामुळे वाचनाकडे लक्ष देऊन लोकराज्य अंक नियमित घेण्याचे आवाहन देखील यावेळी डॉ. घोरपडे यांनी केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी लोकराज्य मासिकाचे महत्व सांगीतले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, लोकराज्य मासिक हे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. वाचनाने विचारांची कक्षा रुंदावते. या मासिकातील प्रत्येक पान आपणास विचारांनी समृद्ध करेल. देशाची भावी पिढी वाचनातून प्रगल्भ होण्यासाठी लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे देखील श्री.सरग म्हणाले. लोकराज्य वाचक मेळाव्याची संकल्पना तसेच उद्देश याबाबत ज्ञानेश भुकेले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिता कोलते, यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संजय लांडगे यांनी मानले. कार्यक्रमाला विलास कसबे, नीलिमा आहेरकर, वैशाली रांगणेकर, विशाल कार्लेकर, संतोष मोरे,दिलीप गांगुर्डे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्यने उपस्थित होते.
५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
वाघिरे महाविद्यालयाच्या वतीने लोकराज्य वाचक मेळाव्याच्या निमित्ताने लोकराज्य अंकावर आधारित परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या परीक्षेस भरघोस प्रतिसाद दिला. ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता.
लोकराज्य वाचक अभियानांतर्गत महाविद्यालयात लोकराज्य च्या विविध अंकाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रदर्शनास भेट देवून अंकांची पहाणी केली. तसेच वर्गणीदार म्हणून नावनोंदणीही केली.

