पुणे: पुणे शहर व परिसरात वातावरणातील बदलामूळे स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराचे सर्व उपचार शासकीय तसेच खाजनी रूग्णालयात उपलब्ध आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. तातडीने रूग्णालयास भेट देवून उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
स्वाईन फ्लू आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, स्वाईन फ्लयू या रोगाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तातडीने आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. सर्व उपजिल्हा रूग्णालये, प्राथमिकआरोग्य केंद्र, शासकीय रूग्णालय व ग्रामीण रूग्णालयात या रोगावर उपचार होतात. त्यामुळे नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप या सारखी लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी. जिल्ह्यातील 249 प्राथमिक केंद्रावर प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. तज्ञांच्या मार्गदर्शना खालीच औषधोपचार घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वातावरणातील बदल व पूर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष देण्याबाबत सूचना या बैठकीत केल्या. तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये स्वाईन फ्ल्यू साठी लागणाऱ्या औषधांचा आढावा त्यांनी घेतला. स्वाईन फ्ल्यू संदर्भातील मार्गदर्शक सूचना सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयात ठळकपणे प्रदर्शित करण्यात याव्यात. शाळा, अंगणवाडी या ठिकाणी जाऊन चाचणी करण्याच्या देखील त्यांनी यावेळी सूचना दिल्या.