पुणे : नवीन औद्योगिक धोरण निश्चित करण्यासाठी उद्योग विभागामार्फत विविध क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद साधण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्येाग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे उद्योजकांशी संवाद साधला. उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सतिश गवई, उद्योग सह संचालक संजय कोरबु, पुणे विभागाचे उद्योग सह संचालक व्ही.एल.राजाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के.जी.डेकाटे, विविध उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक यावेळी उपस्थित होते.
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांनी केलेल्या सूचनांचा नवीन औद्योगिक धोरण निश्चित करताना प्राधान्याने विचार करण्यात येऊन नवीन औद्योगिक धोरण परिपूर्ण असेल, असे यावेळी सांगितले. नवीन औद्योगिक धोरण ठरवताना औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार वाढावा याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. औद्योगिक धोरण ठरवताना महिला उद्योजकांच्या समस्या सोडविण्यात येणार आहे. मोठया प्रमाणावर महिला उद्योजक तयार व्हाव्या, अशी अपेक्षा त्यांनी उद्योजकांशी संवाद साधताना व्यक्त केली. उद्योगांमध्ये विविध क्षेत्रांचा सहभाग वाढत असल्याने, त्या-त्या क्षेत्रात होणाऱ्या उत्पादनांचा विचार करुन औद्योगिक वसाहती निर्माण करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या चर्चासत्रादरम्यान विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि उद्योजकांनी औद्योगिक विकासासाठी महत्वपूर्ण सूचना केल्या.