पुणे- महसूल विभाग अधिक पारदर्शी आणि गतिमान होण्यासाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
राज्यातील सर्व विभागीय आयुक्त यांच्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे आयोजित कार्यशाळेत श्री. पाटील बोलत होते. यावेळी महसूल व मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या विभागांचे विभागीय आयुक्त अनुक्रमे सौरभ राव, जगदीश पाटील, राजाराम माने, पुरुषोत्तम भापकर, अनुप कुमार, पियूष सिंह, राज्याचे नोंदणी महानिरिक्षक अनिल कवडे आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, विविध विभागांच्या तुलनेत सर्वात जास्त निर्णय महसूल विभागाने घेतले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात सुलभता येत आहे, ही बाब आनंदाची आहे. री एडिट मोड्यूल अंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे. येत्या 30 एप्रिल पर्यंत राज्यातील 300 तालुक्यांचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी नियोजन करुन त्याप्रमाणे कार्यवाही करावी, अशी सुचना करुन या कामात अमरावती विभागाचे काम शंभर टक्के झाल्याबदद्ल श्री. पाटील यांनी विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांचे अभिनंदन केले.
श्री. पाटील म्हणाले, प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख होण्यासाठी बऱ्याच ध्येयधोरणांमध्ये बदल करणे आवश्यक असते. हे बदल घडविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी याविषयी अभ्यास करुन जिल्हाधिकारी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकांमध्ये वेळोवेळी चर्चा करुन नागरिकांच्या सोयीसाठी योग्य ते निर्णय घ्यावेत. सुट्टीच्या कालावधीत महसूल कार्यालयात येणाऱ्या सैनिकांना जलद सुविधा मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याबाबत विचार विनिमय करावा.
स्वाधीन क्षत्रीय म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार कामकाज होण्यासाठी राज्य शासन भर देत आहे. यासाठी विभागीय आयुक्तांनी दरमहा जिल्हाधिकारी यांच्याकडून याबाबत आढावा घ्यावा. तसेच या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व्यक्तीश: प्रयत्न करावेत. या कायद्याच्या जनजागृती आणि प्रसारासाठी प्रयत्न करावेत.
माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी यावेळी झिरो पेंडन्सीबाबत मार्गदर्शन केले.
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासाठी मुंबई येथे घेण्यात येणाऱ्या बैठका व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विभागांतर्गत दौरा अपूर्ण ठेवून तातडीने मुख्यालयात उपस्थित रहावे लागते. याचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होतो. यासाठी या बैठका पूर्वनियोजित तारखेलाच होणे आवश्यक आहे, अशा विविध सूचना उपस्थित विभागीय आयुक्तांनी मांडल्या.
यावेळी मुद्रांक शुल्क वसूली शासनाने दिलेल्या उद्दीष्टा पेक्षा अधिक केल्याबद्दल अनिल कवडे यांचे अभिनंदन करण्यात आले. स्वागत प्रभारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले.

