कृषि महोत्सव नव्हे हा तर शासनाचा शेतकऱ्यांशी थेट संवाद असून वाटचाल प्रगतीची, शेतकऱ्यांच्या उन्न्तीची… ओळख करुन घेऊया नव तंत्रज्ञानाची, शासकीय योजनांची.. करा शेती निरंतर फायद्याची. सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील जन्म शताब्दी वर्षानिमित्त कृषि महोत्सव 2018 पुणे या कार्यक्रमाचे आयोजन दि. 9 ते 13 मार्च 2018 या कालावधीत ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राऊंड, सिंचन नगर, पुणे येथे करण्यात आले आहे.
महोत्सवाचा उद्देश
कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतक-यांपर्यत पोहोचविणे. शेतकरी-शास्त्रज्ञ आणि संशोधन-विस्तार-शेतकरी-विपणन साखळी सक्षमीकरण करणे, समुह/गट संघटीत करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतक-यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा तसेच ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे, कृषि विषयक परिसंवाद/व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाण-घेवाणीव्दारे शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे, खरेदीदार-विक्रेता संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
कृषि महोत्सवातील आकर्षणे
कृषि प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्रे, विक्रेता- खरेदीदार सम्मेलन, सहकार परिषद, 250 हून अधिक नामवंत कंपन्यांचा सहभाग, कृषि महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर सदृश्य प्रात्यक्षिके या कार्यक्रमाचा समावेश आहे.
कृषि महोत्सवातील घटक
कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालने, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खादय पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. यामध्ये कृषि व कृषि संबंधित विभाग, कृषि विदयापीठे, कृषि विज्ञान केंद्र, संबधित विविध कृषि महामंडळे यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. शासकीय यंत्रणा बरोबरच खाजगी कंपन्या, उद्योजक, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग असणार आहे.
शेतकरी सन्मान समारंभ
शेतकरी सन्मान समारंभ कार्यक्रमामध्ये जिल्हयातील कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकरी तसेच पिक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा प्रशस्तीपत्रक व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
स्टॉल्स व खाद्य महोत्सव
खते, बी-बीयाणे, औषधे, यंत्रे व औजारे, सिंचन, बायोटेक्नॉजी, हरितगृह, नर्सरी, दुग्ध व्यवसाय व डेअरी, अपारंपारिक उर्जा, प्रक्रिया व पॅकेजींग, सेंद्रिय शेती, सुक्ष्म सिंचन, हॉर्टिकल्चर, पशु संवर्धन इ. बाबींचे विविध कंपन्यांचे 72 स्टॉल्स आहेत. महिला बचत गटांची उत्पादने, गृहपयोगी वस्तु यांचे 40 स्टॉल्स बरोबरच खाद्य महोत्सवाचे पण आयोजन करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क कार्यालयाचे नाव
प्रकल्प संचालक, आत्मा पुणे. (दुरध्वनी क्र. -020-25530431, 9820140996, 9960561454)
–विशाल कार्लेकर
सर्वसाधारण सहायक
जिल्हा माहिती कार्यालय,पुणे

