पुणे: पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी, दिवे येथील ब्रेक चाचणी पथामुळे नागरिकांची सोय होणार असून हा पथ सर्वांसाठी महत्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.
पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी, दिवे येथे सुरु करण्यात आलेल्या ब्रेक चाचणी पथाचे लोकार्पण श्री. रावते यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सहपरिवहन आयुक्त प्रसाद महाजन, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ब्रेक चाचणी पथाची तसेच ब्रेक चाचणीसाठी आलेल्या वाहनांची पाहणी श्री. रावते, श्री. शिवतारे व अन्य मान्यवरांनी केली. तसेच हा पथ तयार करण्यासाठी योगदान दिलेल्या व्यक्ती, संस्था, संघटना व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री. रावते म्हणाले, परिवहन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना जलदरित्या चांगली सेवा देवून समाजात शासनाबाबत सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी. परिवहन विभागाकडे असणाऱ्या कामाची व्याप्ती व त्या तुलनेत असणाऱ्या अपुऱ्या मनुष्यबळाचा विचार करुन नागरिकांनीही सहकार्य करावे, असे सांगून ते म्हणाले, ब्रेक चाचणी पथाचे कामकाज गतीने होण्यासाठी 1 कोटी 31 लाख 72 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून या ठिकाणी कार्यालय,प्रतिक्षाकक्ष, तसेच पाणीपुरवठा,विद्युत सुविधा, अंतर्गत जोडरस्ते व वाहनतळ, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच ब्रेक चाचणी पथाची गरज लक्षात घेवून आणखी एक पथ उपलब्ध करुन दिला जाईल. नागरिकांच्या परिवहन विभागाकडे असणाऱ्या कामांचे स्वरुप विचारात घेवून त्यांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी हा विभाग प्रयत्नशील असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
श्री. शिवतारे म्हणाले, या ब्रेक चाचणी पथावर विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. या परिसराचा पूर्णत: विकास झाल्यास याद्वारे मोठया प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होईल. ज्याप्रमाणे पुरंदरच्या भागात पिकणारे अंजीर, सिताफळ, पेरु ही फळे सर्वत्र प्रसिध्द आहेत, त्याप्रमाणेच या भागातील नियोजित विमानतळ आणि हा पथ अल्पावधीत महत्वाचे केंद्र बनेल.
श्री. सौनिक म्हणाले, याठिकाणी देण्यात आलेल्या सुविधांचा उपयोग करुन प्रादेशिक परिवहन विभागाने नागरिकांना वेळेत सेवा द्यावी.
श्री. महाजन म्हणाले, परिवहन विभागाचे अधिकाधिक संगणकीकरण व यांत्रिकीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच वाहनचालकांना जास्तीतजास्त सुविधा मिळवून देण्यात येत आहेत.
लोकसहभागातून ब्रेक चाचणी पथाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. याठिकाणी येणारे वाहनचालक व परिवहन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टिने मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे मत श्री.आजरी यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सुत्रसंचालनातून विभागाच्या अडीअडचणी मांडल्या. आभार मोटार वाहन निरीक्षक अमरसिंह गवारे यांनी मानले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते