पुणे : राज्यातील सामाजिक न्याय विभागा अंतर्गत शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवंबौद्ध विद्यार्थ्यांसाठी शासनाने गेल्या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना जाहीर केली असून पुणे विभागातील 5669 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ दिलेली आहे, दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
11 वी, 12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवंबौद्ध विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेणे किंवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेचा लाभ घेणे हे दोन पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध राहणार आहेत.
या योजनेनूसार पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्त्या सहित प्रतिवर्ष 30 हजार रुपये, इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात उंच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 51 हजार रुपये तर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 43 हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. ह्या रक्कमे व्यतिरिक्त बैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 2 हजार शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येणार आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे दिनांक 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज http://sjsa.maharashtra.gov.in व http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन समाज कल्याण पुणे विभागाचे प्रादेशिक उपायुक्त पी. एस. कवटे यांनी केले आहे.

