पुण्यात नवीन चार वाहन टेस्ट ट्रॅकला मंजुरी -गिरीष बापट
मुंबई ; पुण्यात वाहन नोंदणी करताना वापराव्या लागणा-या चार नवीन टेस्ट ट्रॅकला मंजूरी देण्यात आली आहे. छोट्या व हलक्या वाहनांची मोशी (भोसरी) येथील ट्रॅकवर टेस्टींग करण्यात येईल तर अवजड वाहनांची दिवे घाटातील ट्रॅक वर टेस्टींग करण्यात येईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी दिली. पुण्याच्या वाढत्या वाहतूक समस्येवर समाधान शोधण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत घेण्यात आलेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीला पुणे शहरातील विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते असे त्यांनी सांगितले.
पुणे शहराच्या वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तसेच पुणे परिवहन कार्यालयाचे ब्रेक टेस्ट तपासणी ट्रॅक तयार करण्यासंबधी चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर बैठकीतील महत्वाच्या मुद्यांविषयी माध्यम प्रतिनिधींना श्री. बापट यांनी माहिती दिली.
श्री. बापट पुढे म्हणाले, दिवे घाटातील टेस्टींग ट्रॅकसाठीच्या प्रस्ताव मार्गी लागला असून त्यासाठी लागणारा 1.20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन तयार करण्यात येणा-या टेस्ट ट्रॅकसाठी योग्य जागांचा शोध घेऊन त्यासाठी लागणारा निधी हा जिल्हा नियोजन समिती मार्फत करण्यात येणार आहे.
स्कूल बस आणि महाराष्ट्र परिवहनच्या बस यांच्या नोंदणीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशी या वाहनांच्या नोंदणीसाठी विशेष वेळ राखिव ठेवण्यात येणार आहे.
रिक्षा चालक आणि मालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यासाठी कामगार मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येणार असून अनेक वर्ष प्रलंबीत असलेल्या मागणीला चालना देण्यात येणार आहे.
पुण्यात रोज नवीन 500 ते 700 वाहने येत असतात याचा यंत्रणेवर येणारा ताण दूर करण्यासाठी दहा अधिकारी सहा महिन्यांसाठी पुणे परिवहन विभागात देण्यात येणार असून, सर्व प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्यात येणार आहेत.
वाहनांच्या आनलाईन नोंदणी संदर्भात येणा-या अडचणी दूर करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल. तसेच पुणे शहरातील वाहतुकी संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असेही श्री. बापट यांनी सांगितले.