सायबर जनजागृती विषयक कार्यशाळा संपन्न
पुणे – पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पोलीस विभागाबरोबरच पत्रकारांनीही
सायबर सुरक्षेबाबत अधिकाधिक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवल्यास सायबर विषयक फसवणूक निश्चित
टाळता येईल, असे प्रतिपादन सायबर गुन्हे विभागाच्या प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांनी
केले.
जिल्हा माहिती कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा
संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग यांच्या विद्यमाने रानडे इस्न्स्टिटयूट आवारात सायबर जनजागृती विषयक
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्रीमती फडके बोलत होत्या. यावेळी सायबर गुन्हे
विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व
वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला बर्वे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पुणे विभागीय
उपसंचालक मोहन राठोड तसेच जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.
सायबर गुन्हे घडल्यानंतर पोलिस त्याचा तपास करतात तथापी, असे गुन्हे घडणार नाहीत यासाठी
नागरिकांमध्ये जगजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. जनजागृती हीच सायबर गुन्ह्यांना रोखणारी
गुरुकिल्ली आहे, असे श्रीमती फडके यांनी सांगितले.
श्रीमती शिंदे यांनी सादरीकरणाद्वारे सायबर सुरक्षेबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, संगणक किंवा
इंटरनेटशी संबंधित घडणारा गुन्हा म्हणजे सायबर क्राईम. मोबाईल किंवा बँक खाते हॅक करणे, क्रेडीट कार्ड
किंवा ऑनलाईन बँकिंगचा गैरवापर करणे, फोन कॉल्स करुन फसवणूक होणे असे सायबर गुन्हे घडतात.
त्यामुळे एटीएम वापरताना किंवा पैसे काढताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आत प्रवेश करु देऊ नका.
तसेच ऑनलाईन बँकींग करतानाही काळजी घ्यावी. सोशल मिडीयावर वैयक्तिक माहिती उघड करु नका.
सोशल नेटवर्किंग साईट वर होणारी फसवणूक टाळण्यासाठीचे खबरदारीचे उपाय, नौकरी मिळवून देण्याच्या
आमिषाने होणारी फसवणूक या बाबत त्यांनी सोदाहरण माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे
देखील दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. सूत्रसंचालन व आभार
माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी मानले. पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदार सरिता वेताळ,
पुणे रेल्वे पोलीस विभागाचे पोलीस हवालदार सुनील बनसोडे, मुळास्वामी, प्रा संदिप नरडेले, प्रा योगेश
बोराटे यांच्यासह पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.