मुंबई: मुलींच्या शाळेतील प्रवेशाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच 100 टक्के मुले-मुली पटावर आणण्यासाठी 15 जून 2016 रोजी शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी कन्या प्रवेशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयातील पत्रकार कक्षात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशाताई लांडगे, इतर कर्मचारी उपस्थित होते.
सर्व लोकप्रतिनीधी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था व नागरीक यांनी या कार्यक्रमात सहभागी होवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्याकरिता हातभार लावावा. तसेच आपल्या भागातील मुलींना आपण स्वत: शाळेत घेऊन जावे व प्रवेश करावा,असेही श्रीमती रहाटकर यांनी यावेळी सांगितले.
शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी 15 जून रोजी लोकप्रतिनीधींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा. या कार्यक्रमांतर्गत शक्य झाल्यास मुलीस शालोपयोगी साहित्य देऊन त्यांचे शाळेत स्वागत करावे, असे श्रीमती रहाटकर यांनी यावेळी सांगितले.
नंदुरबार, गडचिरोली, परभणी, नांदेड, हिंगोली या ठिकाणी शाळेत जाणाऱ्या मुलींचे प्रमाण कमी असून तेथे मुलींचे शाळेत जाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.