पुणे : राज्यात शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेतली आहेत. या योजनेमुळे गावातील प्रत्येक माणसाला पिण्यासाठी शुध्द पाणी मिळाले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे भुमिपूजन श्री.लोणीकर यांच्या हस्ते काल झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती मनिषा पलांडे, मुख्य अभियंता एस.एस.गरंडे, उपविभागीय अभियंता श्रीमती अनिता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता व्ही.एस.आवटे, शिरुर तालुक्याचे गट विकास अधिकारी संदिप जठार, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती रेखाताई बांदल, शिरुर तालुक्याचे सभापती सुभाषराव उमाप, सरपंच जयश्री भुजबळ, माजी सरपंच रामभाऊ सासवडे आदि उपस्थित होते.
श्री.लोणीकर म्हणाले, राज्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी शासनाकडून अडीच हजार कोटी इतक्या रक्कमेची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही चांगली योजना सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी कामे सुरु करण्यात आली आहेत. या योजनेमुळे राज्यातील जनतेला पिण्यासाठी शुध्द पाणी मिळू शकेल. दुषित पाणी पिल्याने गावातील लोक आजारी पडतात, ती आजारी पडू नयेत, त्यांचे आरोग्य चांगले राहाण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील जनतेला चांगले पाणी मिळाले पाहिजे. या नळपाणी पुरवठा योजनेसाठी पुणे जिल्हयाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ही योजना 50 वर्षे टिकेल अशी दर्जेदार कामे झाली पाहिजेत. मुख्यमंत्री टप्पा दोन योजनेचाही आराखडा तयार करण्याचे काम चालू आहे. राज्यातील अनेक जिल्हे हे हागणदारी मुक्त झाले आहेत. राज्यात स्वच्छता अभियानाचेही भरीव कामे झाली आहेत. बऱ्याचशा नदया दुषित झाल्या आहेत. देशाचा विकासासाठी स्वच्छता अभियान राबवून चांगली कामे केली पाहिजेत. शिक्रापूरच्या विकासासाठी अधिक निधीची आवश्यकता असल्यास प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही ते म्हणाले.
आमदार बाबुराव पाचर्णे म्हणाले, या गावामध्ये अनेक विकासाची कामे सुरु केली आहेत. शासनानेही या गावातील बऱ्याचशा समस्या सोडविल्या आहेत. शिक्रापूर-चाकण रस्त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या गावातील प्रत्येकाने गावच्या विकासासाठी सहभाग घेवून योग्य नियोजन करुन कामे करावीत.
यावेळी शिरुर पंचायत समितीचे सभापती सुभाषराव उमाप, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अधीक्षक अभियंता मनिषा पलांडे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रामपंचायतीचे सदस्य नवनाथ सासवडे यांनी मानले.
यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.