पुणे:- चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने तात्काळ नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडे जागा मोकळी करुन द्यावी, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्गा संदर्भात व्ही.व्ही.आय.पी. सर्कीट हाऊस पुणे येथे पालकमंत्री श्री.बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, त्यावेळी उपस्थित संबंधितांना त्यांनी ही सूचना केली. या बैठकीस विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल तेली -उगले, एन.एच.ए.आय. चे प्रकल्प संचालक एस.डी. चिटणीस तसेच संबंधीत विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले, चांदणी चौक येथील प्रस्तावीत उड्डाणपूल व कोथरुड येथील शिवसृष्टी या बी.डी.पी. जागेच्या संदर्भात मा.मुख्यमंत्री महोदयांसोबत लवकरच बैठक घेवून चर्चा करण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेने लवकरात लवकर राज्य शासनाकडे सादर करावा. चांदणी चौकामध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. या उड्डाण पुलासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर नॅशनल हायवे ॲथॉरिटीने या पुलाचे काम तात्काळ हाती घेवून गतीने पूर्ण करावे. महामार्गांच्या कामांचे प्रस्ताव सादर करतांना जिल्हाधिकारी आणि संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून सादर करावेत, जेणेकरुन अनावश्यक खर्च टाळता येईल. आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाचा विकास करतांना देहू ते आळंदी या मार्गाचा विकास होणेही आवश्यक आहे. पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे करत असतांना स्वच्छतागृहांची कामेही प्राधान्याने करावीत. भक्तनिवासची कामे सर्व सोयी-सुविधांनी युक्त करावीत. आळंदी येथे वारकऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्थेवर भर देण्यात यावा.
यावेळी राष्ट्रीय महामार्गावर सुरु असणारी कामे तसेच पुर्ण व अपूर्ण कामांच्या सद्यस्थितीचा आढावा श्री. बापट यांनी घेतला. ते म्हणाले, या वर्षीची रस्त्यांची कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावीत. याबाबत संबंधीत अधिकारी आणि विविध कंपन्यांशी चर्चा करुन सर्व कामे गतीने पूर्ण करा. या कामांच्या प्रगतीचा अहवाल पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत सादर करावा. यावेळी जिल्हयातील महामार्गांवरील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, पालखी मार्गावरील कामे, स्वच्छतागृहे तसेच नऱ्हे- वडगाव येथील नवले पूलानजीक होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा झाली.