पुणे: “राज्यात पुढच्या वर्षी प्लॅस्टिक बंदी करण्यावर माझा भर असणार आहे. त्याचा कायदा बनविण्याचे महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे मी राजकारणावर भाष्य करणार नाही. विधानपरिषद निवडणुका, भाजप, शरद पवार, नारायण राणे यांच्याबद्दल बोलण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. घशाला त्रास होतो,” असे सांगत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज राजकीय भाष्य करणे टाळले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्लॅस्टिक बंदीबाबत विधानभवन येथे पुणे महसुली विभागस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी तसेच पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्याधिकारी उपस्थित होते.या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकीय भाष्य करणे टाळले.
श्री. कदम म्हणाले, वाढत्या लोकसंख्येबरोबरच प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग वापरणाऱ्यावर कारवाई करण्याबरोबरच अशा वस्तूंचे उत्पादन थांबविण्याबाबत तसेच उत्पादन करणाऱ्या उद्योजकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. प्लॅस्टिकच्या दैनंदिन वापरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. यामध्ये आपण सर्वजण जबाबदार घटक असून प्लॅस्टिकबंदीची सुरुवात मी स्वतःपासून केली असून आपणही स्वतः चे घर, कार्यालयात प्लॅस्टिक शिवाय अन्य वस्तूंच्या वापरावर भर देऊन इतरांनाही याबाबत प्रेरित करावे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे राबविण्यात येत असलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
श्री. कदम यांनी पाचही जिल्ह्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी प्लॅस्टिक वापराबाबतच्या सद्य:स्थितीचा आढावा घेऊन प्लॅस्टिक बंदीबाबत विविध सूचनांवर चर्चा केली. श्री. कदम म्हणाले, प्लॅस्टिकबंदीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत विचार करता येईल. प्लॅस्टिकमुक्त ग्रामपंचायत अभियान, प्लॅस्टिकमुक्त ग्रामपंचायती, महानगरपालिकांना रोख रकमेची बक्षीसे देण्याबाबत विचार करता येईल. प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरावर भर देण्यासाठी प्रथम या पिशव्या मोठया प्रमाणात तयार कराव्या लागतील. हे काम बचतगटातील महिलांना दिल्यास महिलांना रोजगार मिळेल व कापूस उत्पादित शेतकऱ्यांनाही फायदा होईल. पर्यावरण संरक्षणाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दक्षता बाळगावी.