राळेगणसिद्धीत सौर कृषी वाहिनीचे भूमिपूजन
ग्रामरक्षक दल अंमलबजावणीसाठी सरपंच मेळावा
अहमदनगर:
राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांसाठी देण्यात येणारी वीज सौर फिडरद्वारेच देण्याची शासनाची योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज उपलब्ध होण्यासोबतच शासनाच्या पैशांची बचत होण्याचा दुहेरी उद्देश साध्य होईल. राज्याच्या या पथदर्शी प्रकल्पाचे देशातल्या अन्य राज्यांनी अनुकरण करत सौर कृषी फिडर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ग्रामरक्षक दलाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सरपंचांचा मेळावा आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे भूमिपूजन राळेगणसिद्धी येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डीले, विजय औटी, बाबुराव पाचरणे, भाऊसाहेब कांबळे, सभापती राहुल झावरे, सरपंच रोहिणी गाजरे, महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने, उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव, वल्सा नायर सिंग, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संचालक संजीवकुमार, जिल्हाधिकारी अभय महाजन व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा ऐतिहासिक दिवस आहे. ग्रामविकास आणि लोकसहभागाचा विचार ज्या राळेगणसिद्धीतून संपूर्ण देशात रुजला त्याच ठिकाणी देशातील पहिल्याच सौर फिडरचे भूमिपूजन होत आहे. या गावात दोन महत्वपूर्ण योजनांचा शुभारंभ होत आहे. ग्रामरक्षक दलाची स्थापना व त्यासाठी कायदा करण्याची भूमिका अण्णांनी मांडली होती. त्यानुसार या कायद्याला मूर्त स्वरूप देण्यात आले. अण्णांनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्यांचा समावेश यात केला आहे. या कायद्यामुळे गावागावातील अवैध दारूचे संकट टळणार आहे. अवैध दारू उत्पादन व विक्रीस या कायद्याने आळा बसणार आहे. या कायद्याच्या अमंलबजावणीतून एक आदर्श गाव तयार होऊ शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सौर कृषी फिडर योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होईल. शेतकऱ्यांना दिवस १० ते १२ तास हमखास वीज मिळण्याची खात्री या योजनेतून देता येणार आहे. याशिवाय शासनाने जलसंधारणात अनेक कामे केली आहेत. अण्णांच्या कामातून प्रेरणा घेऊनच हे काम शक्य झाले. विहिरींसोबतच पाणलोट पुनःर्भरणाकडे जाण्याचे काम राज्याने केले आहे. विविध योजना राज्याने यशस्वीपणे राबवल्या असून परिवर्तन होत आहे.
———
सौर उर्जेवर या: अण्णा हजारे
राज्याला प्रदूषणाच्या विळख्यातून सोडवायचे असेल तर सर्वांनी जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करावा. तसेच अवैध दारू निर्मिती, व्यसनाधीनता व महिलांवरील अत्याचारांवर नियंत्रण आणायचे असल्यास अधिकारी आणि ग्रामस्थांनी हातात हात घालून काम करणे आवश्यक आहे. ग्रामरक्षक दलाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर १२ तासाच्या आत कारवाई करावी लागणार आहे. तसेच दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध माहिती मिळताच पोलिसांना तात्काळ कारवाई करावी लागणार आहे. अत्यंत प्रबळ आणि सक्षम असा हा कायदा असून गावांना निर्भीड बनविण्याचे काम यातून साधणार आहे. ‘वेस्ट इज बेस्ट’ असे सांगून आता कचऱ्यापासून वीज निर्मिती करावी लागणार असल्याचे सांगत अण्णांनी यातून ऊर्जानिर्मितीसह स्वच्छताही साधेल, याकडे लक्ष वेधले.
—————–
ग्रामरक्षक दल राज्याला व्यसनमुक्तीकडे नेणार: बावनकुळे
अवैध दारूच्या निर्मिती व विक्रीला रोखण्यासाठी गठीत करण्यात येणारे ग्रामरक्षक दल हे राज्याला व्यसनमुक्तीकडे नेणारे असल्याचे मत ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि ग्रामरक्षक दलाच्या कायद्याने राज्यात नव महाराष्ट्राची निर्मिती सुरु झाली आहे. पांगरमलसारख्या घटना घडू नयेत, यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे.
सौर कृषी वाहिनी योजनेतून राज्यातील ४२ लाख शेतकऱ्यांना दिवस वीज मिळणार आहे. या योजनेचे जनक मुख्यमंत्री फडणवीस असून त्यांच्याच कल्पनेतून ही योजना साकार झाली आहे. शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या थकबाकीतून दंडव्याज बाजूला करणारे हे पहिलेच मुख्यमंत्री असल्याचे बावनकुळे म्हणाले.
—————————
सौर ऊर्जेने गवे समृद्ध होतील : राम शिंदे
राळेगणसिद्धीने या राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. सौर कृषी फिडर व ग्राम सुरक्षा दलाची स्थापना यासाठी पथदर्शी म्हणून नगर जिल्ह्याची निवड ही आनंदाची बाब असल्याचे पालकमंत्री राम शिंदे म्हणाले. अण्णा हजारे यांचा दूरदृष्टीकोन असून यातून या प्रकल्पांना प्रेरणा मिळणार आहे. ग्रामरक्षक दल हे गावांना व्यसनमुक्त करून समृद्ध करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ग्रामरक्षक दलाची माहिती असलेली पुस्तिका यावेळी प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव वल्सा नायर सिंग आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी केले. या दोन्ही प्रकल्पाचे कळ दाबून मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते डिजिटल भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सुमारे एक हजार सरपंचांनी हजेरी लावली. तर पाच हजारांपेक्षा अधिक नागरिक यावेळी उपस्थित होते.
______________

