पुणे : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दौड आज उत्साहपूर्वक वातावरणात पार पडली. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त या एकता दौडमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोठया प्रमाणावर होता.
विधानभवन पुणे येथे आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ तसेच माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय ‘संकल्प दिन’ या निमित्ताने जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दोन्ही प्रतिमाचे पूजन करुन आदरांजली वाहिली.
यावेळी उपस्थितांना मी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की, मी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वत:ला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन. मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यांमुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरीता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सुध्दा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे. ही राष्ट्रीय एकता दिवस शपथ दिली. तसेच बॉक्सींग स्पर्धेत मनोज पिंगवे, योगामध्ये डॉ.पल्लवी गव्हाणे यांनी अर्जुन पुरस्कार मिळवल्याने विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी त्यांचा सत्कार करुन ‘एकता दौडला’ सुरुवात करण्यात आली.
या एकता दौडमध्ये स्केटींग ग्रुप, सरदार दस्तुर गर्ल्स, सेंट मिराज गर्ल्स, दस्तुर बॉईज स्कूल, आबेदा इमनामदार महाविद्यालय, एनसीसी 36 मराठा, भारत फोर्स, एनसीसी ग्रुप, स्वयंसेवी संस्था, महसूल तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. एकता दौड विधानभवन-फर्स्ट चर्च रोड- साधू वास्वानी चौक- अलंकार टॉकीज- जनलर वैद्य मार्गे संपन्न झाली.