पुणे- येरवडा येथील स्व. राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये संकटग्रस्त महिलांसाठी ‘सखी’ एक थांबा (निवारा) केंद्राचा प्रारंभ जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्या हस्ते झाला. यावेळी उपायुक्त प्रशांत शिर्के,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, बालविकास प्रकल्प अधिकारी उज्वला जाधव, जिल्हा संरक्षण अधिकारी अंजना मोजर, पद्माकर सुरवसे, उषा वायदंडे, नूतन देवकर, सानिका हुंबरे, राजश्री खंडारे, रंजना मोरे, स्मिता शिंदे, एस.आर. कुंभार पद्मश्री महाले, मोहिनी जोशी, राजश्री मोहिते आदींची उपस्थिती होती.
केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रायोगिक तत्त्वावर संकटग्रस्त महिलांसाठी निर्भया एक थांबा केंद्र स्थापन करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्रात अकरा केंद्र स्थापन करण्याबाबत प्रस्तावित आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यासाठी दोन निर्भया केंद्र तात्पुरत्या स्वरूपात शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटल व राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा, पुणे येथे महिला व बाल विकास विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.
या केंद्रात प्रामुख्याने शारिरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक आणि आर्थिक अत्याचारास सामोरे जाणाऱ्या महिलांना आवश्यक सर्व सुविधा एकाच छताखाली देणे हा या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. महिलांना निवासासह पोलीस, वकील, समुपदेशन तसेच वैद्यकीय उपचाराची सोय या सुविधा या केंद्रामार्फत पुरविण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये संकटग्रस्त महिला, युवती पाच दिवस राहू शकतात.
केंद्रामध्ये कायदेशीर मदत पुरविण्यासाठी विधी सल्लागार / वकील, वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, समुपदेशक तसेच पोलीस विभागाकडील एक अधिकारी यांची नेमणूक करण्यात येईल. तसेच सदर केंद्राचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी अशासकीय संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी / कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात कामकाज पाहत आहेत.