पुणे: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या पुणे जिल्हयातील लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार समारंभ बुधवार दि. 18 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी 12 वाजता विधानभवन, पुणे येथे अन्न् व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या राज्यातील लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात मुख्य सत्कार समारंभ दिनांक 18 ऑक्टोबर 2017 रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी संपुर्ण राज्यभरात प्रत्येक जिल्हयामध्ये संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
पुण्यातील कार्यक्रमामध्ये या योजनेच्या पुणे जिल्हयातील 25 लाभार्थी शेतक-यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सपत्निक सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी लाभार्थ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापुर्वी प्रत्येक जिल्हयातील या योजनेतील पहिल्या फेरीतील पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्याचे नियोजन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. याशिवाय योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना नंतर स्थानिक पातळीवर शासकीय यंत्रणेमार्फत प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.