पुणे दि. 15: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत प्रस्तावीत रिंग रोड मुळे शहरातील कनेक्टीव्हीटी चांगली होणार आहे. या रिंग रोड मुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शहरातील ट्रॅफिकही कमी होणार आहे. प्रचंड वेगाने नागरिकीकरण होत असल्यामुळे पीएमआरडीएने सुनियोजित नियोजन केले असून याचा निश्चितच नागरिकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करुन त्यांना विकसित प्लॉट देण्यात येतील यात कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे प्रतिपादन जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयोजित टि. पी. स्कीम कार्यशाळा, सोनाई कार्यालय उरुळी देवाची येथे ते बोलत होते. या कार्यशाळेसाठी रिंगरोड क्षेत्रात येणा-या उरुळी देवाची, वडकी, फुरसुंगी, फडतरे वाडी, गायकवाडवाडी, सायकरवाडी, तरवडी या गावातील संबधित जमिनधारकांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी निरसन केले.
प्रकल्पबाधित लोकांचे प्रश्न सोडविण्यात येतील, शेतक-यापर्यंत या योजनेसंदर्भात योग्य माहिती पोहोचविली जाईल. प्रत्येक गोष्टीची कल्पना शेतक-यांना देऊनच या कामास सुरुवात केली जाईल. सर्वांच्या फायद्यासाठीच ही योजना असून यामुळे सर्व नागरिकांची सोय होणार आहे. लवकरच या परिसरात पीएमआरडीएचे कार्यालय सुरु करण्यात येईल. ज्यामुळे नागरिकांना नकाशाव्दारे अधिका-यांकडून थेट माहिती मिळू शकेल व शंकांचे निरसन करण्यात येईल असेही श्री. शिवतारे म्हणाले.
प्रस्तावीत रिंग रोड 129 कि.मी. चा असून शेतकऱ्यांची संमती मिळाल्यापासू तीन महिन्यात ड्राफ्ट टाऊन प्लॅनिंग स्किम तयार करण्यात येईल. पाणी, गटारे, वीज तसेच गार्डन, शाळा, दवाखाने, बसस्टँड, पार्कींगची जागा, ओपनस्पेसच्या सर्व सुविधा पीएमआरडीएमार्फत पुरविल्या जातील. या योजनेमार्फत शेतक-यांचा आठपट फायदा होईल. रिंगरोड जवळील शेतक-यांना रिंगरोड लगतच जमिन मिळेल. शेतक-यांना चौकोनी आकाराचे भुखंड देण्यात येईल. प्रत्येक प्लॉटला रस्ता देण्यात येईल अशी माहिती श्री. गित्ते यांनी दिली.
या कार्यशाळेस पीएमआरडीएचे नियोजनकार विजयकुमार गोस्वामी, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता सुनिल वांढेकर, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव सासकर, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, राजीव भाडळे, सचिन घुले, ग्रामपंचायत सदस्य प्रविण कामठे, संदिप मोडक आणि संबधित गावांचे सरपंच तसेच जमिनधारक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.