पुणे,दि. 13: दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अंड्याचा आहारात समावेश असणे खूप आवश्यक आहे.अंडयांचा आहारात समावेश केल्यास आपण बऱ्याच आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो. यासाठी अंड्याविषयी जनजागृती,व्यापक प्रसिद्धी आवश्यक आहे. अंड्याचे महत्व शेतकऱ्यांना समजल्यास शेती व्यवसायाला पूरक असा कुक्कुटपालन व्यवसाय वाढेल. या व्यवसायाकडे युवकांनी गांभीर्यानी पाहिल्यास युवक उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतात, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. जागतिक अंडी दिनानिमित्त मानवी आहारातील अंडयाचे पोषणमूल्य नागरिकांपर्यत पोहोचविणे, कुक्कूट पालन व्यवसायास चालना मिळावी व ग्रामीण भागात रोजगार निमिर्तीस चालना मिळावी यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात ते बोलत होते.
आरोग्याच्या दृष्टीने अंड्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. आजच्या काळात महिलांची शारीरिक स्थिती अवघड आहे.यासाठी महिलांनी दैनंदिन आहारात अंड्याचा समावेश करावा.अंडी उत्पादन घराघरांत व्हावे याकरिता शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही. एक सजग नागरिक म्हणून युवकांनी या मोहिमेचा प्रसार करावा अशी अपेक्षा पालकमंत्री मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तालुका समन्वयक शिल्पा ब्राह्मणे यांनी शिरूर तालुक्यातील स्वयंसहायता बचत महिला बचत गटामार्फत सुरु असलेल्या अंडी उत्पादन व्यवसायाच्या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल माहिती दिली. आहारतज्ञ् डॉ. गीता धर्मती यांनी आहारातील अंड्याचे महत्व त्यातील महत्वाचे घटक याविषयी माहिती दिली. तसेच अंड्याविषयी असणारे गैरसमज याबद्दल शंकानिरसन केले. यावेळी उपस्थितांना उकडलेली अंडी वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले.आभारप्रदर्शन अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन आशिष जरद यांनी केले.
यावेळी केंद्रीय कुक्कुट अनुसंधान केंद्राच्या निर्देशक भारती सिंह, कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव विकास देशमुख,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई,मार्केट यार्ड कमिटीचे चेअरमन दिलीप खैरे,सहआयुक्त डॉ. गजानन राणे, वेंकीज इंडियाचे व्यवस्थापक विजय तिजारे विद्यार्थी, नागरिक, तसेच विविध विभागातील अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.