सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात त्यापैकीच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत असून या योजनांची माहिती पुढील प्रमाणे.
मातंग व तत्सम 12 पोट जातीतील म्हणजेच मांग, मातंग, मिनी मादगी, मादीग,दान खणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादीगा या पोट जातीतील लोकांना अर्ज करता येतील.
योजनेचे स्वरुप- महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या अनुदान बीज भांडवल योजनेंतर्गत 2017-18 या आर्थिक वर्षासाठी एकुण 4.72 कोटींच्या उदिष्टाची तरतूद आहे.यात अनुदान योजनेतर्गत 2 कोटीची तरतूद आहे. त्यात 2000 प्रकरणे केली जातील. बीजभांडवल योजनेंतर्गत 330 लाभार्थीकरीता 2.39 कोटींचे उदिष्ट आहे. यात नवीन 330 प्रकरणे केली जातील. दोन्ही योजनांची बॅक निहाय उदिष्ट जिल्हयाच्या अग्रणी बँक अधिकारी यांच्या मार्फत पुणे जिल्हयातील राष्ट्रीयकृत कार्यरत बँकांना वितरीत करण्यात आली आहेत.
विशेष घटक योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजारपर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान मिळते. प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान देण्यात येते. अनुदान वगळून बाकीची रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी केली जाते. कर्ज फेड 36 ते 60 मासिक हप्त्यात बँकेकडे करावी लागते.
बीजभांडवल योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50,001 रुपये ते 7 लाखापर्यंत आहे. 50,001 ते 7 लाखापर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणात 10 हजार रुपये अनुदान वगळता उर्वरीत कर्जात 5 टक्के अर्जदारांचा सहभाग, 20 टक्के महामंडळाचे कर्ज (10 हजार रुपये अनुदानासह ) व 75 टक्के बँकेची कर्ज रक्कम आहे. महामंडळाच्या कर्जाची परतफेड 4 टक्के व्याजाने महामंडळाकडे करावयाची आहे.
अर्ज करण्याची पध्दत-
या योजनेच्या लाभासाठी एका लाभार्थीस एकच कर्ज मागणी अर्ज दिला जाईल. पुणे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील गरजुंनी विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातुन घेवून जिल्हा कार्यालयातच जमा करणे आवश्यक.
संपर्क कार्यालयाचे नाव- जिल्हा व्यस्थापक, 424, मंगळवार पेठ, लडकत पेट्रोल पंप जवळ, पुणे.
-विशाल कार्लेकर–सर्वसाधारण सहायक; जिल्हा माहिती कार्यालय,पुणे