पुणे दि. 20 : सिंहगड महोत्सव आयोजनाबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सांस्कृतिक कार्य विभागाने तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
शिवकालीन पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या सिंहगड किल्ल्याचा इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी ‘सिंहगड महोत्सवाचे’ आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली, त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना श्री. राव यांनी ही सूचना दिली. बैठकीला आमदार भिमराव तपकीर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कोहिनकर, तहसीलदार मीनल कळस्कर, सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यक्रम अधिकारी भरत लांघी, पुरातत्व विभागाचे जतन सहायक रामेश्वर निपाणे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राव म्हणाले, सिंहगडाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती शालेय विद्यार्थ्यांबरोबरच सर्वदूर पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सिंहगड महोत्सव आयोजित करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. यासाठी प्रथम राज्य शासनाला महोत्सवा बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावामध्ये महोत्सवा अंतर्गत घेण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रम, सिंहगडाच्या इतिहासाचे स्मरण करुन देणाऱ्या विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाची तसेच अन्य आवश्यक माहितीचा समावेश असणे गरजेचे आहे. रायगड महोत्सवाच्या धर्तीवर या महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत योग्य ती माहिती घेण्याच्या सूचना श्री.राव यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिल्या. शिवकालीन दस्तऐवज, शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्याबाबत पुरातत्व विभागा बरोबर यावेळी चर्चा करण्यात आली. या कालावधीत सिंहगडावर होणारी वाहतुकीची गर्दी, पार्किंगबाबतचे नियोजन, स्वच्छता, आरोग्य सुविधा, सुरक्षा पासेस, घेण्यात येणारे कार्यक्रम व कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या नावांची यादी तसेच विविध कार्यक्रमामध्ये सहभागी कलाकार, स्पर्धक यांची यादी आदी बाबींचे सुक्ष्म नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
आमदार भीमराव तापकीर म्हणाले, सिंहगड महोत्सवामध्ये मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असावा. हा महोत्सव दर्जेदार होण्यासाठी यात शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था तसेच सिंहगड संवर्धनासाठी व गडाचे पावित्र्य जपण्यासाठी कार्यरत संस्थांनाही सहभागी करुन घ्यावे.
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी उपस्थितांना महोत्सव आयोजनाबाबत माहिती दिली. शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड म्हणाले, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम, सरदार नावजी बलकवडे यांच्या शौर्यगाथा व सिंहगडाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. या महोत्सवात सिंहगडाचे छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, शाहीरी मानवंदना, सिंहगड गिर्यारोहण स्पर्धा, ढोलताशा, मॅरेथॉन व सायकल स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन श्री. गायकवाड यांनी केले. बैठकीस संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.