पुणे, दि. 18 : राज्यातील सततच्या दुष्काळी व नापिकीच्या परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 जाहीर केली आहे. या योजनेला 22 सप्टेंबर 2017 पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली आहे. पुणे जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत, त्यांनी जवळच्या महा ई–सेवा केंद्रावर किंवा ‘आपले सरकार’ या संकेत स्थळावर आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे जिल्हास्तरीय अंमलबजावणी व नियंत्रण समितीच्या बैठकी दरम्यान केले.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा, उपविभाग व तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात आलेली आहे. पुणे जिल्हा स्तरावरील जिल्हा स्तरीय अंमलबजावणी व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रगती व योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा श्री. राव यांनी घेतला.
या योजने अंतर्गत लाभार्थ्यांची माहिती, वित्तीय संस्थांनी आपले सरकार पोर्टलवर तात्काळ भरावयाची आहे. राष्ट्रियीकृत बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले खाते असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेमध्ये व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लाभार्थी अर्जदारांनी संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामध्ये आपल्या आधार कार्डाची छायांकित प्रत त्वरीत सादर करावी, असेही आवाहन श्री राव यांनी केले.