पुणे, दि. 16: केंद्र सरकारच्या ‘कृत्रिम अवयव वाटप कार्यक्रम’ योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव आणि सहायकारी यंत्र प्रदान करण्यासाठी पुण्यात एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात अधिकाधिक दिव्यांग व्यक्ती सहभागी व्हावेत आणि त्यांना याचा लाभ व्हावा, यासाठी संबंधित विभागांनी काटेकोर नियोजन करावे, अशी सूचना खासदार अनिल शिरोळे यांनी केली.
विकलांग प्रशिक्षण शिबिराच्या पूर्व नियोजन बैठकीत त्यांनी ही सूचना दिली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अपंग कल्याण विभागाचे उपायुक्त नितीन ढगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, तहसीलदार मीनल कळस्कर तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार श्री. शिरोळे म्हणाले, केंद्र सरकारची ही योजना दिव्यांग व्यक्तींसाठी महत्वपूर्ण आहे. या योजनेचा लाभ गरजू दिव्यांगांना मिळवून देण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांची मदत घ्यावी.
जिल्हाधिकारी श्री. राव म्हणाले, पुण्यात होणाऱ्या शिबिराचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींना व्हावा, यासाठी या शिबिराची माहिती गरजूंपर्यंत पोहोचायला हवी. यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यरत जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, शासकीय विभाग तसेच पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मदत घेवून पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची अद्ययावत यादी करावी. याबरोबरच सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करावी.
उपायुक्त श्री. ढगे यांनी शिबिरामध्ये लाभ मिळू शकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी पात्रतेच्या अटींबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित दिव्यांग व्यक्ती भारताचा नागरिक असावा, त्याच्याकडे 40 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र हवे, मागील 3 वर्षात या योजनेचा लाभ त्याने घेतला नसावा, उत्पन्न दरमहा 15 हजार पेक्षा जास्त नसावे. अशा अटी असून ओळखपत्राचा पुरावा आवश्यक आहे, असेही श्री. ढगे यांनी सांगित