पुणे, दि. 1 : पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थांनी अवांतर वाचन तसेच लिखाणाला जास्त महत्व
द्यावे. शुध्दलेखन व शब्दांचा योग्य व प्रभावी वापर केल्यास विद्यार्थी पत्रकारितेच्या क्षेत्रात नाव कमावू शकतो, असे
प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी आज येथे केले.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी
जिल्हा माहिती कार्यालयास भेट दिली, त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रा.जयप्रकाश पाटील,
प्रा.रणजित पंडित उपस्थित होते.
वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच जिल्हा
माहिती कार्यालयाच्या कामकाजाची ओळख व्हावी यासाठी भेटीचे आयोजन करण्यात आले होते. श्री.सरग यांनी यावेळी
जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शासनाचे मुखपत्र असलेल्या तसेच पाच
भाषांतून प्रसिध्द होणाऱ्या लोकराज्य मासिकाबद्दल माहिती, आकाशवाणीवरुन प्रसारित होणारा दिलखुलास कार्यक्रम,
जनसंपर्काची विविध माध्यमे, सोशल मिडीयाचा जनसंपर्कासाठी वापर याबद्दल मार्गदर्शन केले. दर्शनी व वर्गिकृत
जाहिराती आणि त्याचे महत्व याबद्दल माहितीसुध्दा विद्यार्थ्यांना देण्यात आली.
प्रा.जयप्रकाश पाटील यांनी, जिल्हा माहिती कार्यालयास भेट व तेथील कामाची प्रत्यक्ष पाहणी याचा
विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयोग होईल असे सांगितले. यावेळी जयंत कर्पे, रोहित साबळे, नितीन सोनवणे, मिलिंद
भिंगारे, सुगतकुमार जोगदंड ,जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.