पुणे दि. 25: आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे, या तरुणाईला मानवसंसाधनात परिवर्तीत करणे आवश्यक आहे. येत्या पाच वर्षात आपल्याला नवभारताची निर्मिती करावयाची असून या प्रक्रीयेत शैक्षणिक संस्थांची भूमीका महत्वाची आहे. शिक्षण संस्थांनी कौशल्यधारित शिक्षण देवून नवभारत निर्मितीत आपले योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
वारजे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार मेधाताई कुलकर्णी, आमदार भिमराव तापकीर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहर देव, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाहक प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाहक प्रा. सुरेश तोडकर, प्रा.सौ. ज्योत्सना एकबोटे उपस्थित होते.
श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपला देश सध्या संक्रमाणावस्थेतून जात आहे. आपल्या देशात तरुणाईची संख्या मोठी आहे. या तरूणाईला कौशल्याधारित शिक्षणाची जोड देणे आवश्यक आहे. आपला देश जगाचा मार्गदर्शक व्हावा असे आपले सर्वांचे स्वप्न आहे, हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. येत्या पाच वर्षात भ्रष्टाचार, अस्वच्छता अशा वाईट व्याधींपासून मुक्त असणारा देश आपल्याला घडवायचा आहे. यासाठी प्रत्येक देशवासीयांनी कोणती ना कोणती जबाबदारी उचलली पाहिजे.
माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कक्षा रुंदावल्या आहेत. गेल्या दोन वर्षात राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. नवभारत घडविण्यात शिक्षण क्षेत्राची महत्वाची भूमीका आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाने आराखडा तयार केला आहे. त्यामाध्यमातून शासनाचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात देशात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या राज्याला पहिल्या क्रमांकावर न्यायचे आहे. त्यासाठी राज्यातील 30 हजार शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. सरकारी शाळांबरोबरच खासगी शाळांतूनही दर्जेदार शिक्षण मिळावे ही सरकारची भूमीका आहे. त्यादृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत.
प्राथमिक शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केवळ पदवी देणारी शिक्षण संकुले उभी न राहता ज्ञान आणि संस्कार देणाऱ्या शिक्षण संस्था निर्माण होण्याची आवश्यकता आहे. गुणवत्ता राखण्याचे विद्यापीठांचे काम आहे, महाविद्यालये स्वायत्त असावीत. उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच त्यामागची भूमीका आहे. पदव्यांबरोबरच रोजगार निर्मिती होण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम आहे. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रात चमकले आहेत. येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यावर संस्थेचा भर असतो.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या दिवाकर पारखी, हिरामण जगताप, शारदा हगवणे व रणजित हगवणे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांच्या हस्ते मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहायता निधीʼसाठी 15 लाखांचा धनादेश देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेच्या ‘ज्ञानमयʼ रिसर्च जर्नलचे प्रकाशन, मॉडर्न शैक्षणिक संकुलच्या स्मरणिका, वेबसाईट आणि नूतन संकुलाचे रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले. तर आभार प्रा. यशवंत कुलकर्णी यांनी मानले.