पुणे,दि.१२-पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या पाहता पोलिस आयुक्त कार्यालय कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ते मार्गी लागेल ,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या तीन विकास प्रकल्पांचे उदघाटन आणि दोन प्रकल्पांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार बाळा भेगडे, गौतम चाबूकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, आयुक्त श्रावण बर्डिच आदी उपस्थित होते. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात हा कार्यक्रम झाला.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार अतिशय गतीने होत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. लवकरच त्याबाबतच्या आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्यावर पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय जाहिर केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याच्या कानाकोपर्यातून रोजगारासाठी पिंपरी चिंचवड येथे नागरिक आले आहेत. येथील उद्योगाने सर्वांना संधी दिली आहे. आता राज्य शासन या शहराला विकासाची संधी देणार आहे. या संधीचा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करतो.
पुण्यापेक्षा जास्त गतीने विकास करण्याचे पिंपरी चिंचवडमध्ये क्षमता आहे. मात्र महापालिकेने स्वच्छता, कचरा विल्हेवाट आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर भर द्यायला हवा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी आवश्यक असणार्या सर्व विकास प्रकल्पांसाठी राज्य शासन प्राधान्याने मदत करेल. त्यासाठी आवश्यक असणारा निधी पुरवला जाईल.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी राज्य शासन सर्व मदत करण्यासाठी तत्पर आहेच गरज भासल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जाईल, असे सांगितले.
महापौर नितीन काळजे यांनी प्रास्ताविक केले. आभार स्थायी समिति सभापती सीमा सावळे यांनी केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पुणे पोलीस आयुक्त कार्यालय मार्फत विकसित करण्यात आलेल्या सिटी सेफ मोबाइल अप्लिकेशनचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.