पुणे : भीमाशंकर येथे दरवर्षी लाखो भाविकांसह पर्यटकही येत असतात. त्यामुळे भीमाशंकर विकास आरखडा राबविताना तज्ज्ञांबरोबरच येथे येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिकांच्या सूचना विचारात घ्याव्यात अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनी आज दिल्या.
डींभे ता. आंबेगाव येथील शासकीय विश्रामगृहात श्री. क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली भीमाशंकर विकास आराखड्याची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी श्री. क्षत्रीय बोलत होते. विकास आरखडा बैठक घेण्यापूर्वी श्री. क्षत्रीय यांनी भीमाशंकर देवस्थान परिसराला प्रत्यक्ष भेट देवून तेथील भाविकांशी व स्थानिकांशी विकास आराखड्याबाबत संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता व्ही.बी. माळोदे, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, तहसिलदार बी.जे. गोरे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुनिल देशमुख, प्रशांत काळे-पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी राव यांनी भीमाशंकर विकास आराखड्याबाबत मुख्य सचिवांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनव्दारे सादरीकरण केले. या आराखड्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती दिली.



