शासनाच्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यात माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण
पुणे : सामाजिक न्याय विभागाच्या तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यत पोहोचविण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, असे मत समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने आयोजित पत्रकार कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. सुनिता साने, प्र.जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक पांडुरंग गिरे, ओबीसी महामंडळाचे व्यवस्थापक अनंत मालुसरे आदी उपस्थित होते.
श्री.आढे यांनी यावेळी समाज कल्याण विभागाच्या शैक्षणिक, सामाजिक लाभाच्या विविध योजनांची माहिती दिली. वसतिगृह, आश्रमशाळा, अपंग विभाग, शिष्यवृत्ती योजना, स्वाधार योजना, अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत विविध योजनांचीही सविस्तर माहिती विषद केली. तसेच सामाजिक सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. श्री.आढे म्हणाले, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची सखोल माहिती सर्वदूर पोहचविणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथांची प्रसिध्दी पत्रकारांनी करणे गरजेचे आहे. त्यामुळे या विभागाची प्रतिमा उंचाविण्यास नक्कीच मदत होईल.
श्रीमती पाटील म्हणाल्या, शासनाची प्रतिमा जनमानसात उंचावण्यात माध्यमे महत्वपूर्ण भूमिका बजावतात. माध्यम प्रतिनिधींनी शासनाचे महत्वपूर्ण निर्णय व लोकहितार्थ योजनांची माहिती सर्वत्र पोहचविणे गरजेचे आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वंचित घटकांसाठीच्या विविध योजनांची प्रसिध्दी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने केली जाते. या योजनांची प्रसिध्दी सर्व प्रसार माध्यंमांनी प्रभावीपणे केल्यास त्याचा लाभ गरजूंना निश्चित होईल.
श्री.मालुसरे यांनी इतर मागसवर्गीय घटकातील 352 जातींना महामंडळाद्वारे दिले जाणारे लाभ तसेच आर्थिक कर्ज, वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी लागणारी कागदपत्रे व अर्ज करण्याची पध्दत, लागणारा कालावधी याबाबत माहिती दिली.
श्री.गिरे यांनी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजासाठीच्या विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार उपस्थित होते.