पुणे : ऊस कारखानदारीने महाराष्ट्राचे आर्थिक चित्र बदलले आहे, त्यामुळे राज्य सरकार साखर कारखानदारीसह सहकार क्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत साखर कारखान्यांच्या सह-विजनिर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या वीजेच्या खरेदीसाठी सरकार सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्य साखर संघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार अजित पवार, पतंगराव कदम, जयंत पाटील, शंकराराव कोल्हे, जयप्रकाश दांडेगावकर, शिवाजीराव पाटील, शिवाजीराव नागवडे, सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त बिपीन शर्मा, डॉ. इंद्रजीत मोहिते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ऊस शेतीने महाराष्ट्राचे चित्र बदलले आहे, शेती क्षेत्रात आर्थिक उन्नती आणली आहे. वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटने ऊस उत्पादनासह तंत्रज्ञानावर चांगले संशोधन केले आहे. मात्र आता आपली स्पर्धा ही जागतीक पातळीवर आहे. त्यामुळे ऊस उत्पादन, तंत्रज्ञानाबरोबरच ऊस उत्पादनानंतरच्या व्यवस्थापनातही आता संशोधन करण्याची आवश्यकता असून या माध्यमातून पारदर्शी व्यवस्था उभारण्याची आवश्यकता आहे.
गेल्या काही दिवसापासून दुष्काळामुळे ऊसाचे क्षेत्र कमी झाले आहे. मात्र आता परिस्थिती सुधारत आहे. कोणत्याही परिस्थितीत सहकार व साखर कारखानदारीच्यामागे सरकार ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे दर देण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारनेही कारखान्यांना मदतच केली आहे. गेल्या काही दिवसात उत्तर प्रदेशात साखरचे उत्पादन वाढले असले तरी आपली साखर कारखानदारी शेतकऱ्यांच्या हिताची आहे. आपण एफआरपीच्या ९८ टक्के दर शेतकऱ्यांना दिला आहे. ऊस कारखान्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या सहवीज प्रकल्पातून तयार होणारी वीज ही स्वच्छ ऊर्जा असल्याने या प्रकल्पातून तयार होणारी वीज थोड्या अधिकच्या दराने विकत घेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. या बाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. मात्र हे करताना या अधिकच्या वीज अधिभाराचा बोजा उद्योगांसह इतर व्यवसायिक वापरांच्या उपभोक्त्यांवर पडणार नाही याचीही काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे गुंतवणुक आणि परतावा यांचा विचार करुनच सहवीज निर्मिती प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. इथेनॉल हे सुध्दा शुध्द इंधन आहे, त्यामुळे इथेनॉलचा दर परवडण्यासाठी राज्य सरकार केंद्रसरकाकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार शरद पवार म्हणाले, गेल्या काही वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका साखर उद्योगाला बसला आहे. पावसाचे प्रमाण दरवर्षी कमी होत जात आहे. त्यामुळे यापुढे कमी पाण्यावर तग धरणारे आणि अधिकचा उतारा देणाऱ्या ऊसांचे वाण विकसीत करण्याची अवश्यकता आहे. ऊस कारखानदारी ही महाराष्ट्राची आर्थिक ताकद आहे. त्यामुळे या उद्योगाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जुन्न्र तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला देण्यात आला. तर कै. विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ठ उद्योजकता पुरस्कार दौंड तालुक्यातील दौंड शुगर कारखाना व डॉ. सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ठ ऊस विकास व संवर्धन पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री.दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला देण्यात आला. तसेच उस उत्पादक शेतकरी, कारखाने, अधिकारी, कर्मचारी, विभागांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या तांत्रिक कार्यक्षमता अहवाल आणि डिस्टलरी अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यभरातील शेतकरी, कारखानदार, पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.