पुणे : हास्य योग ताणतणावनिर्मित अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी उत्कृष्ट उपाय असून रुग्णालयस्तरावर हास्य योगाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती डॉ. मेधा कामत यांनी महिला दिनानिमित्त एन. एम. वाडिया रुग्णालयात आयोजित हास्य योग शिबीरा प्रसंगी दिली.
वाडिया रुग्णालयाच्या पुढाकाराने रुग्णालयाच्या महिला डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय सहायक (पॅरामेडीकल) कर्मचारी व इतर रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसाठी डॉ. कामत यांचे हास्य योग शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
डॉ. कामत यावेळी म्हणाल्या की, डॉ. मदन कटारिया यांनी मार्च 1995 साली मुंबईत हास्य योग चालू केला. त्याचा प्रसार आता 106 देशांमध्ये झाला आहे. दैनंदिन जीवनामध्ये ताणतणाव वाढलेले असून हास्ययोगामुळे दैनंदिन जीवनातील व कामाच्या ठिकाणी विविध प्रकारच्या ताणतणावापासून मुक्ती मिळते. रुग्णालये, कारागृहे, पोलीस विभाग, कार्पोरेट कार्यालयांमध्ये काम करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात ताणतणावांना सामोरे जावे लागते. आपल्या देशात हास्ययोग आतापर्यंत केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू असल्याचे पहावयास मिळते. परंतू हास्ययोग मुलांपासून सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी उपयुक्त असून सर्वांना यामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
वाडिया रुग्णालयात झालेल्या या शिबीरात हास्ययोगाचे थोडक्यात सादरीकरण करुन डॉ. कामत यांनी सर्वांना हास्ययोगाची माहिती दिली. हास्ययोगामध्ये सहभागी झालेल्या रुग्णालयातील सर्व महिला डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनी ताणतणावरहित स्थितीचा अनुभव घेतल्याचे सांगितले. याप्रमाणेच भविष्यकाळातही हास्ययोगाची आणखीन तसेच नियमित तत्त्वावर हास्ययोग शिबीरे आयोजित करण्याची गरजही उपस्थितांनी व्यक्त केली.