नवी दिल्ली : आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक मुंबई येथील मुमताज काजी आणि मुंबईच्याच महिला उद्योजिका रिमा साठे यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते आज नारी शक्ती या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिना निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित शानदार कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष २०१६ चे राष्ट्री ‘नारी शक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या देशातील विविध महिला व संस्थांना यावेळी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील रेल्वे चालक मुमताज काजी आणि महिला उद्योजिका रिमा साठे यांना यावेळी गौरविण्यात आले .
मुंबई येथील रेल्वे चालक मुमताज काजी यांनी वयाच्या २० व्या वर्षा पासूनच डिजल लोकोमोटिव रेल्वे चालविण्यास सुरुवात केली. त्यांच्या या साहसी कामाची दखल घेत राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. बहु प्रतिष्ठीत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने १९९५ मध्ये मुमताज काजी यांना पहिली डीजल लोकोमोटिव ड्रायव्हर म्हणून समाविष्ट केले आहे. मुमताज यांना २०१५ मध्ये रेल्वे महाप्रबंधक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले .
हॅप्पी रूट्स फुड्स अँड ब्रेवरेज इंडिया प्रा.लि. उद्योग समुहाच्या प्रमुख रिमा साठे यांनी आपल्या उद्योगाच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकरी, आदिवासी शेतकरी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या विकासात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. कांदा, टोमॅटो, धान्य आणि पोल्ट्री उत्पादनाची श्रृखंला निर्माण करून ‘थेट कृषी उत्पादन नेटवर्कींगद्वारे’ त्यांनी महाराष्ट्रातील १२ हजार अल्पभूधारक शेतकरी व आदिवासी शेतक-यांना जोडले. या कार्यक्रमाद्वारे सामुदायिक कुक्कुटपालनाअंतर्गत १५ हजार महिलांनाही रोजगार उपलब्ध झाला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्वयंसेविका म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. दक्षिण आफ्रीकेत महिला सशक्तीकरणासाठी तसेच भारतात बालकांच्या शिक्षणासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीत श्रीमती साठे यांनी सहभाग नोंदविला आहे.