मुंबई : देशाच्या मानव संसाधनात 50 टक्के महिलांना प्रशिक्षण देऊन सहभागी करून घेतले आणि त्या अर्थव्यवस्थेचा भाग झाल्या तर देशाची प्रगती झपाट्याने होते. त्यामुळे राज्य शासन महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना राबविण्यास प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभाग आणि ग्राम विकास विभागाच्या वतीने आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, महिला व बाल विकास विभागाच्या सचिव विनिता वेद सिंघल, ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापक कुसुम बाळसराफ आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी विभागाच्या वतीने मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘रेंट अ होम’ या संकेतस्थळाचे अनावरण, माझी कन्या भाग्यश्री योजनेतील दोन लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप, इलेक्ट्रॉनिक फिजिओ ग्रोथ मॉनिटिरिंग सिस्टिम (ईपीजीएमएस) चे उद्घाटन, तसेच उमेद कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणींना रोजगार नियुक्ती पत्र वाटप, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार, तसेच सुमतीबाई सुकळीकर योजनेअंतर्गत दोन महिला स्वयंसहाय्यता गटांना कर्जाच्या धनादेशाचे वाटप मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, समाज पुरोगामी व्हायचा असेल तर महिलाच त्यासाठी पुढाकार घेत असते. ज्या समाजात महिलांना सन्मान दिला जातो तो समाज प्रगतीचे शिखर गाठत असल्याचे दिसते. जगात ज्या देशाने प्रगती केली त्यात मोलाचा वाटा हा महिलांचा आहे. मानव संसाधनात 50 टक्के महिलांना प्रशिक्षण देऊन सहभागी करून घेतले तर देशाचा विकास झपाट्याने होतो. ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा महिला भाग झाल्या तो देश विकसित झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे धोरण आखून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हे अभियान सुरू केले आहे. राज्य शासनानेही विकासाच्या योजनांमध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून त्या आखण्यास प्राधान्य दिले आहे.
सांगलीत घडलेल्या घटना या मानवतेला काळिमा फासणाऱ्या आहेत. कडक कायदे असतानाही पैशासाठी अशा स्त्रीभ्रूण हत्या घडत असतील, तर अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी राज्य शासन कडक पावले उचलत आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आज चाळीस टक्के बालके कुपोषित आहेत. माता सुदृढ नसेल तर मुलांच्या पोषणात कमतरता येते. त्यातून पुढच्या पिढीचा विकास थांबतो. त्यामुळे महिला बाल विकास विभागाने सुरू केलेला इलेक्ट्रॉनिक फिजिओ ग्रोथ मॉनिटिरिंग सिस्टिम (EPGSM) हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे. या माध्यमातून बालकांच्या आरोग्याचे ऑनलाईन ट्रॅकिंग सिस्टीममुळे कुपोषणावर मात करण्यासाठी उपाययोजना करता येतील व त्याचे मूल्यमापन करता येईल. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ सारखी योजना असेल किंवा महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आखलेल्या योजनांमुळे महिलांचे सक्षमीकरण होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रत्येक जिल्हा, तालुक्यात महिला बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी मॉल तयार व्हावेत, त्यातून महिलांच्या सक्षमीकरणाला हातभार लागेल. महिलांच्या गर्भाशयाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी विभागाने तयार केलेल्या लसीकरण उपक्रमास राज्य शासन व आरोग्य विभाग मदत करेल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
महिला व बालविकास मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, आजच्या महिला या घराचा उंबरठा ओलांडून आपले कर्तृत्व दाखवत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी, राजमाता जिजाऊ, माता रमाई यांच्याकडून प्रेरणा घेऊन आजची महिला वाटचाल करत आहे. तरीही आज समाजातील सर्वच स्तरात स्त्रीयांना नाकारण्याचे स्त्रीभ्रूण हत्या करण्याचे घडत असलेले प्रकार निंदनीय आहेत. अशा घटनांविरुद्ध राज्य शासन कठोर पावले उचलत आहे. महिलेला सुरक्षा, सन्मान आणि ताकद देण्याची जबाबदारी ही महिलेची आहे. त्यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे.
महिलांच्या गर्भाशयाच्या कर्करोगाचा आजार रोखण्यासाठी महिलांना या आजाराचे लसीकरण देणे आवश्यक आहे. त्यासाठीचा कार्यक्रम आखला असून उपजिल्हा रुग्णालयामार्फत हे आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना लसीकरण देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असेही श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मानवी व्यापार रोखण्यासाठीच्या कृती आराखड्याचे प्रकाशन, यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव श्रीमती विनिता सिंघल यांनी केले तर आर. विमला यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती अंबेकर यांनी केले.
‘लोकराज्य’मधील यशोकथा प्रेरणादायी – मुख्यमंत्री
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित ‘लोकराज्य’ मासिकाच्या महिला शक्ती विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ‘लोकराज्य’च्या महिला शक्ती विशेषांकात विविध क्षेत्रात पथदर्शी काम करणाऱ्या महिलांच्या यशोगाथांचा समावेश आहे. या यशोकथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. |