पुणे : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. गणित आणि विज्ञानाचे शिक्षणही मातृभाषेतून उत्कृष्ट पध्दतीने होते, असे मत विचारवंत व साहित्यिक अजित अभ्यंकर यांनी आज येथे व्यक्त केले.
कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त पुणे विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. पुणे विभागाचे माहिती उपसंचालक मोहन राठोड, प्र. जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील, मराठी भाषा संचालनालयाचे म.दु.लोखंडे आदी या प्रसंगी उपस्थित होते.
भाषिकांचा दर्जा हा भाषेला मिळत असतो असे सांगून श्री. अभ्यंकर म्हणाले की, इंग्रजी सत्तेच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचा प्रभाव आपल्यावर निर्माण झाला. हे पाहता भाषिकांमधील विषमता घालविण्याची गरज असून मराठीचा बौध्दीक आणि अभिरुचीचा दर्जा वाढवला पाहिजे.
ते पुढे म्हणाले विज्ञान आणि गणित हे मराठीतून चांगल्या प्रकारे शिकता येवू शकते याची उदाहरणे लोकांसमोर ठेवली पाहिजेत. यासाठी वरिष्ठ शासकीय सेवांमधील अधिकारी, शास्त्रज्ञ, व्यावसायिक आदींना मराठीचे ब्रँड अँबँसेडर म्हणून नेमले पाहिजे. शासकीय विभागांनीही मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्न केले पाहिजे.
उपसंचालक मोहन राठोड म्हणाले की, जगात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख दहा भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. कुसुमाग्रजांच्या कविता, साहित्य, नाट्यसंपदेने मराठी भाषेला अमूल्य ठेवा दिला असून मराठीला गौरव मिळवून देण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी मराठी भाषा सल्लागार समिती नेमण्यात आली. या समितीने महाराष्ट्र शासनाला सादर केलेला अहवाल राज्य शासनाने केंद्र शासनाला सादर केला असून अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
यावेळी मराठी भाषा संचालनालयाचे श्री. लोखंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार प्र.जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन माहिती सहायक सचिन गाढवे यांनी केले. कार्यक्रमास विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.