पुणे– महानगरपालिका, नगर परिषदांनी शहर विकासाच्या योजनांच्या अंमलबजाणीसाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी, क्रेडीट रेटींग (पत मानांकन) करुन घ्यावे अशी सूचना मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी केली.
अमृत मिशन योजनेंतर्गत यशदा येथे राज्यातील विविध महानगरपालिका, नगर परिषदांमधील प्रकल्प नियोजनाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात सहभागी झालेत्या प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय बोलत होते. यावेळी यशदाच्या उपमहासंचालक सोनाली पोंक्षे-वायंगणकर, प्रशिक्षण उपमहासंचालक डॉ.नरेश झुरमुरे उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय म्हणाले की, शहराचे नियेाजन करताना पंचविस वर्षानंतर शहराच्या होणाऱ्या वाढीचा विचार करण्यात यावा. यशदामधील प्रशिक्षण, प्रकल्पाच्या नियोजन व अंमलबजावणीच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. येथील प्रशिक्षणामध्ये मिळालेल्या ज्ञानाचा व माहितीचा आपल्या सहकार्यांनाही लाभ मिळवून द्यावा. स्थानिक स्वराज्य संस्थांनी द्वि-नोंद लेखा पध्दत अंमलात आणावी व एनर्जी आणि वॉटर ऑडीट करुन घ्यावे तसेच क्षमता विकासावर भर द्यावा, अशी सूचना यावेळी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी केली.
यावेळी मुख्य सचिवांनी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विविध महानगरपालिका व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी, त्यांना यशदा येथील प्रशिक्षणात मिळालेल्या प्रशिक्षणासंदर्भात थेट संवाद साधून त्या-त्या महानगरपालिकांमध्ये राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाविषयी माहिती घेतली.
यशदाच्या उपमहासंचालिका सोनाली पेांक्षे-वायंगणकर यांनी, योजनांच्या अंमलबजावणी मानवीय दृष्टीकोनातून करावी असे प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. प्रशिक्षण उपमहासंचालक डॉ.नरेश झुरमुरे यांनी प्रशिक्षण आयोजनाचा हेतू स्पष्ट करुन अशाप्रकारचे प्रशिक्षणाचे आयोजन यापुढेही करण्यात येणार आहे असे सांगितले.
या प्रशिक्षणात विविध महानगरपालिकांचे नगर रचना, स्वच्छता व आरोग्य, मिळकत कर व्यवस्थापन विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.