पुणे, दि. 10 : कौंटुबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणे, त्यांची सुरक्षितता तसेच कायद्याबाबत सर्वांगिण जाणीव, जागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कौंटुबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम-2005’ अंमलबजावणीबाबत कार्यशाळा आज संपन्न झाली.
जिल्हा परिषद पुणे येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत कायद्याची अंमलबजावणी, कायद्याच्या नियमातील तरतुदींची माहिती या क्षेत्रात कार्यरत संरक्षण अधिकारी, विधिज्ञ, समुपदेशक व स्वयंसेवी संस्था यांना अवगत होण्यासाठी व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती.
पीडीत महिला तसेच मुले या कायद्याच्या मदतीने कोणाकडून कशी मदत मिळवू शकतात याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये संरक्षण अधिकारी यांची भुमीका व जबाबदारी. समुपदेशकांना पीडीत महिलेस करावयाची मदत, जलद न्यायालयीन प्रक्रियेची माहिती या गोष्टींवर ॲड. रमा सरोदे व ॲड.असुंता पारधे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने झाले. महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त पी.बी. शिर्के, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी बिराजदार, बालविकास अधिकारी मुंडे, दक्षता कक्ष प्रमुख तथा वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेहेंदळे, महिला व आर्थीक विकास महामंडळाचे नितीन काळे, संरक्षण अधिकारी सरिता पाटील, तसेच समाजकार्यातील विद्यार्थी, सामाजिक संस्थेतील स्वयंसेवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.