पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्हयामध्ये आचारसंहिता भंगाचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्हाभरात स्थापन करण्यात आलेली भरारी पथके, स्थिर सर्व्हेक्षण पथके तसेच व्हिडीओ सर्वेलन्स पथकांनी कारवाई तीव्र करावी, असे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज दिले.
जिल्हयात 11 जानेवारीपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु आहे. या दरम्यान नंदकुमार किसनराज गोले, रा. वाडेबोल्हाई (ता. हवेली) आणि शिवांजली शिवाजीराव वाळके, रा. पेरणे (ता. हवेली) यांच्यावर हवेली तालुक्याच्या निवडणूक निर्णय अधिका-यांनी भारतीय दंड संहिता कलम 171 (ह) अन्वये आचारसंहिता भंगाबाबत गुन्हा दाखल केला आहे.
वेल्हा तालुक्याच्या निवडणूक निर्णय अधिका-यांनी गणेश प्रकाश कोळपे आणि दिगंबर दिनकर चोरघे, रा. वांगणी (ता. वेल्हे) यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 188 व मोटार वाहन अधिनियम कलम 232 (177) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चा भंग करुन रॅली काढल्यामुळे सागर सोपानराव मारणे आणि मिनाथ मा. कानगुडे व इतरांवर मुळशी तालुक्याच्या निवडणूक निर्णय अधिका-यांनी गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्हयात 85 भरारी पथके, 72 स्थीर सर्व्हेक्षण पथके आणि 55 व्हिडीओ सर्व्हेलन्स पथके अशी 200 हून अधिक पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील बारामती, वालचंदनगर, भिगवण, दौंड, शिरुर, शिक्रापूर, सासवड, भोर, हवेली, लोणीकंद, वेल्हा, पौड, वडगाव मावळ, कामशेत, चाकण, मंचर, घोडेगाव, जुन्नर, आळेफाटा, ओतूर आदी 68 ठिकाणी तपासणी नाके (चेकपोस्ट) स्थापन करण्यात आले आहेत. आतापर्यंत या पथकांनी दोन हजारच्या वर वाहने तपासली आहेत. पंधरा हजार 798 बॅनर्स, पोस्टर्स व झेंडे आदी विनापरवाना प्रचार साहित्य काढून टाकण्यात आले आहेत.
माघारीनंतर उमेदवारी निश्चीत झाल्यावर पथकांची संख्या वाढवावी. पथके अहोरात्र कार्यरत ठेवावीत. मद्याची वाहतूक, मोठया रकमांच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत करण्यासह सर्व पथकांनी आपली कारवाई अधिकाधिक तीव्र करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. राव यांनी दिल्या आहेत.

