ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादारांसोबत बैठकीत घेतला आढावा
कोवीड-19 रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत
पुणे,दि. 31: कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादारांसोबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बैठक घेत आढावा घेतला.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात 135 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून उत्पादकांकडे 790 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्यातरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असे दिसून येते. तथापि पुण्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांना आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करावी. तसेच अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी नियोजन करावे, जेणेकरुन भविष्यात देखील ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही. बैठकीत उत्पादक व पूरवठादारांच्या अडचणी जाणून घेऊन उपाययोजनांबाबत डॉ. देशमुख यांनी चर्चा केली.ऑक्सिजन निर्मिती कारखान्यात असलेले कर्मचारी व टँकर ड्रायव्हर यांना ‘लस’ उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन उत्पादकांनी केले असता लस उपलब्ध करुन देऊ, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.
उत्पादक व पुरवठादारांना काही अडचण भासल्यास औषध विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त सुरेश पाटील यांनी यावेळी केले.
कोवीड-19 रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत
कोवीड-19 रुग्णालये आणि कोवीड-19 हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.
राज्यात तसेच जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोवीड-19 रुग्णांना पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. राज्यात पुरेसे ऑक्सीजनचे उत्पादन होऊनसुध्दा वितरण योग्य प्रकारे होत नसल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता तुटवडा होत असल्याची शक्यता आहे. भविष्यात कोवीड-19 रुग्णसंख्येत वाढ होईल आणि ऑक्सीजनची गरज वाढेल ही बाब लक्षात घेता ऑक्सीजन पुरवठा सुरळीत होण्याचे दृष्टीने सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर समिती गठीत केली आहे. पुणे जिल्हयात कोरोना विषाणू ( कोवीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अखंडितपणे सुरु राहण्याकरीता ऑक्सीजन पुरवठा संनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून नियोजन करणे
सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे यांनी उत्पादकांशी समन्वय व बॉटलींग प्लॅंटमधून वाटपाचे नियोजन करणे.
महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांनी उत्पादनात वाढ व उत्पादकांशी समन्वय साधणे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे व पिंपरी यांनी वाहतूक-टॅंकर समन्वय राहण्याबाबतचे नियोजन करणे.
उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महानगरपालिका पुणे पिंपरी चिंचवड यांनी जिल्हयातील कोविड-19 रुग्णांना औषधोपचार करणा-या सर्व सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका आणि खाजगी रुग्णालयांना प्रतिदीन लागणा-या ऑक्सीजनची माहिती रुग्णालयानुसार संकलीत केलेली माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे यांना द्यावी
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यातील कोविड-19 रुग्णांना औषधोपचार करणाऱ्या सर्व सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका आणि खाजगी रुग्णालयांना प्रतिदिन लागणाऱ्या ऑक्सीजनची माहिती रुग्णालयानुसार संकलित करावी आणि संकलित माहितीची प्रत निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे यांना द्यावी.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी जिल्हयातील कोविड-19 रुग्णांना औषधोपचार करणाऱ्या सर्व सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका, आणि खाजगी रुग्णालयांना प्रतिदिन लागणाऱ्या ऑक्सीजनची मागणी नोंदविणे.
जिल्हास्तरीय समितीची कार्ये
समितीने दैनंदिन ऑक्सीजनची गरज व ती पुरविणाऱ्या बॉटलिंग प्लांट्स बल्क सप्लायर्स
यांच्या सतत संपर्कात राहून प्रत्येक रुग्णालयात वेळेत ऑक्सीजन प्राप्त होईल, याची दक्षता घ्यावी.
जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पावसाळयासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंट्रोल रुमला ऑक्सीजन पुरवठयाची जबाबदारी पुढील आदेश हेाईपर्यंत देण्यात येत आहे. कंट्रोल रुमचा वापर ऑक्सिजन पुरवठ्याशी संबंधित अडचणी सोडवणूक करण्यासाठी करावा.
पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रुम दुरध्वनी क्र. 020-26123371 वर संपर्क साधावा. या कंट्रोल रुमला काही अडचण असल्यास त्यांनी एफडीए कंट्रोल रुम दूरध्वनी क्र. 022-26592364 व टोल फ्री क्र. 1800222 365 संपर्क साधावा. यानुसार समितीने कार्यवाही करुन कोणत्याही रुग्णालयात ऑक्सीजन पुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
00000