जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना
ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादारांसोबत बैठक
पुणे,दि. 23: कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या.
जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादारांसोबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला औषध विभागाचे सहआयुक्त सुरेश पाटील, औषध निरीक्षक प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात 135 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून उत्पादकांकडे 790 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्यातरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असे दिसून येते. तथापि पुण्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांना आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करावी. तसेच अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी नियोजन करावे, जेणेकरुन भविष्यात देखील ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही. बैठकीत उत्पादक व पूरवठादारांच्या अडचणी जाणून घेऊन उपाययोजनांबाबत डॉ. देशमुख यांनी चर्चा केली.
ऑक्सिजन निर्मिती कारखान्यात असलेले कर्मचारी व टँकर ड्रायव्हर यांना ‘लस’ उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन उत्पादकांनी केले असता लस उपलब्ध करुन देऊ, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.
उत्पादक व पुरवठादारांना काही अडचण भासल्यास औषध विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त सुरेश पाटील यांनी यावेळी केले.
00000

