कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Date:

पुणे: पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात येतील. रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत नियंत्रित संचार राहील, याची अंमलबजावणी करा. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न समारंभ होतील, याची दक्षता घ्या, असे निर्देश देवून कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी च्या मध्यरात्री पासून या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (दूरदृश्य प्रणाली), खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ.डी. बी.कदम आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक ते उपाय सुचवून त्यांची तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा. शहर व ग्रामीण भागात हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा. संपर्क शोध मोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबवा. शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करा, असे सांगून कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होवून संसर्ग रोखण्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी त्यांनी फ्ल्यू सदृश्य रुग्णांची तपासणी करुन घ्यावी, असेही सांगितले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, 200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम होतील याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये २८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवावीत. मात्र अभ्यासिका निम्या क्षमतेने नियम पाळून सुरू राहतील याची खात्री करा. हॉटेल, बार रात्री ११ पर्यंतच सुरु राहतील याची दक्षता घ्या, असे सांगून रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी करा. वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे या अत्यावश्यक सेवांना सूट द्या. जिल्ह्यात सर्वत्र कोविड केअर सेंटर तात्काळ सुरु करा. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना गतीने करा, असे सांगून ससून रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळ व यंत्र सामुग्री पुरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील म्हणाले, शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. त्याचबरोबर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांचेही सहकार्य आवश्यक आहे.

खासदार गिरीश बापट म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करुन रुग्णांना वेळेत सेवा-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

डॉ. सुभाष साळुंके यांनी कोविड नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. जुन्या हॉटस्पॉट भागात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. 25 सप्टेंबर 2020 ते 31 जानेवारी 2021 पर्यंत कोरोनाचा रुग्ण दर नियंत्रणात होता. तथापि, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्णांची टक्केवारी वाढून दहा टक्क्यांवर गेली आहे. प्रशासनाच्या वतीने प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत, पण नागरिकांनीही नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोविड-19 ची सद्यस्थितीची माहिती देऊन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

ठळक मुद्दे

*जिल्ह्यात लॉक डाऊन नाही; मात्र नियमांची कडक अंमलबजावणी
*200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम
*रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी (अत्यावश्यक सेवा- वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे वगळून)
*हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रीत करा
*मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करुन उपाययोजना प्रभावीपणे राबवा
*जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरु करा
*नमुना तपासण्यांची संख्या वाढवा

  • मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा
  • नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...