पुणे: पहिल्या टप्प्यात निदान होवून वेळीच योग्य उपचारास सुरू झाल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होवू शकतो. कॅन्सरवरील उपचार महागडे असून हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी या क्षेत्रात अधिक संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलच्या नवीन कॅन्सर विंगचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजश्री बिर्ला, बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, अश्विन कोठारी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, देशात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे, महाराष्ट्रातही कॅन्सर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कॅन्सर हा अत्यंत त्रासदायक आजार असून याचा परिणाम रुग्णासोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. पहिल्या टप्प्यात कॅन्सरचे निदान होवून योग्य उपचार सुरु झाल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होवू शकतो. कॅन्सरच्या रुग्णांना किर्णोत्साराची उपचार पध्दती घ्यावी लागते, हा प्रकारही मोठा त्रासदायक असून त्याचे दुष्परिणाम रुग्णाला भोगावे लागतात. योग्य प्रकारे किर्णोत्सार उपचार पद्धती घेतल्यास हे दुष्परिणाम टाळून रुग्णाची कॅन्सरपासून मुक्तता होवू शकते.
आदित्य बिर्ला रुग्णालयात उभारण्यात आलेल्या नव्या कॅन्सर विंगमध्ये अत्याधुनिक मशनरींचा व तंत्रज्ञानाचा समावेश असल्याचे सांगत श्री. फडणवीस म्हणाले, या रुग्णालयाचा उपयोग पुण्यासह राज्यातील अन्य ठिकाणच्या कॅन्सर पिडीत रुग्णांना होणार आहे. बिर्ला ग्रुपचे सामाजिक दायित्व कौतुकास्पद असून केवळ फायद्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला नाही, तर यामागे सामाजिक भावना आहे. मात्र कॅन्सरच्या उपचारासाठी अत्यंत महागड्या मशनरींची आवश्यकता असल्याने कॅन्सरच्या उपचारावरील खर्च वाढत जातो. हा खर्च सामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी या क्षेत्रात नव्याने संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक भाषणात राजश्री बिर्ला म्हणाल्या अदित्य बिर्ला मेमेारीयल हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांना अत्याधूनिक उपचार देण्यात येणार आहेत.
रुग्णालयाचे विश्वस्त अश्विन कोठारी यांनी आपल्या भाषणात कॅन्सर रुगणांना अत्याधूनिक उपचाराबरोबरच कॅन्सर रोगांवरील समुपदेशनही या रुगणालयाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी कुमार मंगलम बिर्ला यांनी उपस्थितांचे आभार मानले.



