पुणे, दि. 23 : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली अपंग कल्याण विभागाच्या योजनांबाबत आढावा बैठक अपंग आयुक्तालयात संपन्न् झाली. याप्रसंगी अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील बैठकीत अपंग कल्याण आयुक्तालयात चालू असलेल्या कामाचे सादीकरण करण्यात आले. तसेच अपंगत्व येवूच नये यासाठी काय करता येईल, अपंगत्वाचे प्रमाणपत्रे देणेसाठी शिबीर घेणे सन 2016-17 साठी योजनानिहाय मंजूर प्राप्त तरतूद झालेला खर्च आदिबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
याबाबत 23 डिसेंबर 2015 रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्तावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शाळा गुणवत्ता सुधार समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याप्रमाणे झालेली कार्यवाही, अंध, अपंग, मतिमंद शाळांचे प्रलंबित प्रस्ताव, अनुदान याबाबतही आढावा घेण्यात आला. यावर्षी कोणताही निधी परत जावू नये याची काळजी घ्यावी अशा सुचना श्री. बडोले यांनी दिल्या. तसेच दिनांक 21 जुलै 2016 रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीनुसार झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने विशेष शाळेतील विशेष शिक्षकांचा विशेष दर्जा लक्षात घेवून माध्यमिक वेतनश्रेणी, कंत्राटी पदांना नियमित वेतन मिळणेबाबत चर्चा झाली. प्रारंभी अपंग कल्याण आयुक्तालय आवक – जावक संगणकीय प्रणालीचे उदघाटन सामाजिक न्यायमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
अपंग कल्याण आयुक्तालयाची वेबसाईट तयार करावी. किती शाळा आहेत, शासकीय किती आहेत, अनुदानित किती आहेत, विद्यार्थी संख्या आदि माहिती याव्दारे उपलब्ध झाली पाहिजे अशा सुचना श्री. बडोले यांनी दिल्या. अपंगाच्या समस्येबाबत बैठक : याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अपंगाच्या समस्येबाबतची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी आ. मेधा कुलकर्णी, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, अपंग संस्थेचे संस्थापक आदि उपस्थित होते.
अपंगाच्या योजनाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाव्दारे यशदाच्या मार्फत वर्षभराचे प्रशिक्षणाचे नियोजन करण्याच्या सुचना श्री. बडोले यांनी दिल्या.
याप्रसंगी उपस्थितीत संस्थाचालकांनी मुकबधीर, कर्णबधीर, मतिमंद यांच्याबाबतच्या विविध समस्या अडचणी मागण्या मांडल्या. याबाबत नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे श्री. बडोले यांनी सांगितले.

