पुणे : देशभरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या उद्घाटनाचा मान पुणे शहराला मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यासह 98 स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उदघाटन येत्या 25 जून 2016 रोजी होणार आहे. पंतप्रधानांचा हा दौरा यशस्वीरित्या पार पडावा यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने आपापली जबाबदारी चोखरित्या पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज येथे दिल्या.
पंतप्रधान दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी श्री. राव यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन येथे बैठक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, राजशिष्टाचार उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यासह पुणे शहर पोलीस, पुणे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, विमानतळ प्राधिकरण, एअर इंडिया, महावितरण, बीएसएनएल आदी विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुण्यासह 98 स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बालेवाडी येथे 25 जून रोजी होणार आहे. या सर्व शहरांच्या प्रकल्पांचे ऑनलाईनरित्या उद्घाटन ते करणार आहेत. यावेळी ही सर्व शहरे संगणकाद्वारे ऑनलाईन जोडलेली असणार आहेत. शिवाय काही स्मार्ट सिटीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांसमवेत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधनार आहेत. यावेळी बीएसएनएल, एनआयसी, सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व तांत्रिक पूर्तता करुन अखंड ऑनलाईन संवादाची व्यवस्था राहील याची दक्षता घ्यावी.
पोलीस विभागाने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवावा. पंतप्रधानांच्या आगमनापासून प्रयाणापर्यंत सर्व ठिकाणी जबाबदार माणसे नेमून चोखरित्या भूमिका बजावावी. सुरक्षा पासेस देताना सर्व ती माहिती तपासून पासेस द्यावेत. पुणे महानगरपालिकेने पंतप्रधान यांच्या विमानतळ ते बालेवाडी तसेच अन्य प्रवासाचे रस्ते चोखरित्या दुरुस्त करुन घ्यावेत, वेगनियंत्रक काढावेत, सांडपाणी रस्त्यावर येणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. शहरातील 15 ठिकाणी या कार्यक्रमाचे एलईडी स्क्रीनवरुन प्रक्षेपण होणार आहे. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता तेथील सुरक्षा व्यवस्थेबाबतही पोलीसांनी नियोजन करावे. असेही सौरभ राव यावेळी म्हणाले.
पंतप्रधानांसाठी तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्धततेची व्यवस्था, त्यांचे सुरक्षा पथक, अधिकारी, कर्मचारी यांची व्यवस्था, वाहनांची व्यवस्था आदी व्यवस्थांबाबतही या बैठकीत श्री. राव यांनी सूचना दिल्या.