मुंबई : ‘कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत एमटी एज्युकेअर लि. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सामंजस्य करार झाला असून, त्यामुळे दरवर्षी राज्यातील 15 हजार युवकांना अद्ययावत प्रशिक्षण मिळणार आहे.
यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त विजय वाघमारे, एमटी एज्युकेअर लिमिटेडचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये
- एमटी एज्युकेअर लिमिटेड सध्या केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाबरोबरच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणा राज्यांबरोबरही काम करीत आहे.
- आज झालेल्या सामंजस्य करारानुसार आता एमटी एज्युकेअर लिमिटेडकडून प्रत्येक वर्षी 15 हजार युवकांना आधुनिक शिक्षण प्रणालीचा उपयोग करुन प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
- एमटी एज्युकेअर लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्रातील युवकांना रिटेल, लॉजिस्टिक, इन्शुरन्स, अकाऊंटिग, बँकिग या विषयांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण देईल, तसेच दरवर्षी 75 टक्के प्रशिक्षित युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी कंपनी पार पाडेल.
- हा करार पाच वर्षांसाठी असून येत्या महिनाभरात तो कार्यान्वित होईल.
- ही कंपनी युवकांच्या प्रशिक्षणासाठी आधुनिक शिक्षण पध्दतीसह व्हिडिओ कॉन्फरन्स ब्रॉडकास्टिंग सिस्टीमचा वापर करणार आहे.
- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था या सामंजस्य करारासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. हा सामंजस्य करार महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.
- मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहानंतर कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील एकूण 24 सामंजस्य करार केले असून आतापर्यंत 21 सामंजस्य करार कार्यान्वित केले आहेत.