पुणे,- कृषि उत्पादनाला जोडधंदा म्हणून पशुसंवर्धन आणि त्यातून मिळणारे उत्पादन म्हणून आतापर्यत बघितले जात होते. मात्र आता शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन जोडधंदा म्हणून न बघता स्वतंत्र व्यवसाय म्हणूनकरावा. यासाठी पशुसंवर्धन विभाग सक्षम करायला हवा असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे केले.
पशुसंवर्धन विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन औंध येथील पंडित भिमसेन जोशी कलामंदिरात करण्यात आले होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना पशुसंवर्धन मंत्री बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाम, अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ.गजानन राणे व अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त हरिभाऊ गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना पशुसंवर्धन महादेव जानकर म्हणाले की, पशुसंवर्धनामध्ये राज्यात मोठी संधी आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सकारात्मकपणे कार्य केले पाहिजे. ग्रामीण भागातील पशुधन वाढावे यासाठी खात्यातर्फे उपाययोजना करण्यात येत आहे. जनावरांना लाळ-खुरकुत रोगमुक्त करण्यासाठी पशुसंवर्धन खात्यातील अधिकाऱ्यांनी शास्त्रज्ञ बनून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची सूचना केली. पशुसंवर्धनाबरोबरच दूग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय वाढीसाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढ करणे, पशुसंवर्धन व उपचारासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करणे, जनावरांच्या दवाखाना निर्मितीसाठी खाजगी व स्वयंसेवी संस्थांची सहकार्य घेणे, शेतकऱ्यांच्या मुला-मुलींमध्ये पशुसंवर्धनामध्ये कौशल्य निर्माण करणे, नवीन अभ्यासक्रम सुरु करणे, दूग्धव्यवसायवाढीसाठी विविध उपाययोजना करणे आदि उपक्रम पशुसंवर्धन विभागातर्फे येणाऱ्या काळात राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.
पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, पशुसंवर्धनामुळे या विभागातील अधिकाऱ्यांना समाजात मोठा मान आहे. पशुसर्वधन खात्यातील अधिकारी पशुसंवर्धनाद्वारे निसर्ग आणि संस्कृती रक्षणाचे कार्य करीत आहेत
असे ते म्हणाले. पशुसंवर्धन वाढीसाठी अधिकाऱ्यांनी आत्मीयतेने कार्य करावे अशी सूचना त्यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी पशुसंवर्धन विभागाने केलेली प्रगती, तसेच भविष्यातील पशुसंवर्धन विषयक योजना व त्याची अंमलबजावणी याबाबत माहिती
दिली. भविष्यात पशुसंवर्धन विभाग आय.एस.ओ.मानांकर प्राप्त करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याहस्ते यावेळी पशुसंवर्धन खात्याच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. उपस्थितांनी यावेळी पशुसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. मंत्रीमहोदयांच्याहस्ते
उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सपत्निक सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन आणि कामधेनू पुजनाने करण्यात आली.
यावेळी पशुसंर्वधन विभागातील राज्यातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

